उद्या ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार; कोणकोणत्या नेत्यांची वर्णी लागणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2019 02:27 PM2019-12-29T14:27:34+5:302019-12-29T15:08:41+5:30
भाजपा सरकारच्या काळात शिवसेनेला दुय्यम मंत्रीपदे देण्यात आली होती. तसेच जास्त नेत्यांना संधी मिळालेली नव्हती.
मुंबई : महाराष्ट्रात निवडणुकीचे निकाल लागून दोन महिने होत आले तरीही महाविकास आघाडीला मंत्रिमंडळाचा विस्तार करता आलेला नाही. सरकार स्थापनेवेळीही असा वेळकाढूपणा करण्यात आला होता. यावरून गेल्या काही दिवसांपासून टीकेचे धनी ठरलेल्या उद्धव ठाकरे सरकारला अखेर मुहूर्त सापडला आहे. उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून पहिल्या टप्प्यात 36 जण मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
भाजपा सरकारच्या काळात शिवसेनेला दुय्यम मंत्रीपदे देण्यात आली होती. तसेच जास्त नेत्यांना संधी मिळालेली नव्हती. आता शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांचे सरकार आलेले असल्याने काही नेत्यांचे मंत्रिपदाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. तर पाच वर्षांपूर्वी सत्तेतून बाहेर गेलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही मंत्रिपदासाठी जोरदार फिल्डिंग लावलेली आहे. आज काँग्रेसच्या संभाव्य मंत्र्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार संभ्याव्य मंत्र्यांची यादी समजली आहे.
शिवसेनेकडून अनिल परब, रविंद्र वायकर किंवा सुनील प्रभू, सुनील राऊत, उदय सामंत, भास्कर जाधव किंवा वैभव नाईक, शंभुराजे देसाई, प्रकाश अबिटकर, संजय शिरसाट किंवा अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, आशिष जैस्वाल किंवा संजय रायमुलकर, बच्चू कडू, संजय राठोड, प्रताप सरनाईक, गुलाबराव पाटील, दादा भुसे किंवा सुहास कांदे या आमदारांना मंत्रिपदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
तर काँग्रेसकडून के. सी. पाडवी, अशोक चव्हाण, अमित देशमुख, प्रणिती शिंदे, सतेज पाटील, विश्वजित कदम, विजय वड्डेटीवार, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड किंवा अमिन पटेल यांच्या नावावर थोड्याच वेळात शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीकडून कोण?
राष्ट्रवादीकडून अजित पवार हे शपथ घेणार आहेत. यानंतर दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, बाळासाहेब पाटील, दत्ता भरणे, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक, धनंजय मुंडे, राजेश टोपे, डॉ. राजेंद्र शिंगणे, अदिती तटकरे, डॉ. किरण लहामटे यांच्या नावाची वर्णी लागण्याची शक्यता आहे.