Maharashtra Politics: “आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला नरेंद्र मोदींचा पराभव करावाच लागेल”: पृथ्वीराज चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 05:08 PM2022-10-25T17:08:45+5:302022-10-25T17:09:47+5:30
Maharashtra News: भारत जोडो यात्रा ही मोदी हटाव यात्रा असून, महाराष्ट्रातील यात्रेत सहभागी होण्यासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना निमंत्रण देण्यात आल्याचे पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितले.
Maharashtra Politics: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेचा सकारात्मक प्रभाव सन २०२४ मधील लोकसभा निवडणुकीवर दिसून येईल. आगामी लोकभा निवडणूक ही काँग्रेससाठी अतिशय आव्हानात्मक असून, त्यात नरेंद्र मोदी यांचा पराभव काँग्रेसला करावाच लागेल, असे स्पष्ट मत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.
कराड येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा येत आहे. भारत जोडो यात्रा ही मोदी हटाव यात्रा आहे. नरेंद्र मोदी जोपर्यंत पंतप्रधान राहतील तोपर्यंत देशातील, विखारी आणि विषारी वातावरण कायम राहणार आहे. म्हणूनच बदल अतिशय गरजेचा आहेत. त्यासाठी येऊ घातलेल्या निवडणुका जिंकाव्याच लागतील, असे चव्हाण म्हणाले.
काँग्रेससमोर लोकसभा निवडणुकांचे मोठे आव्हान
काँग्रेस पक्षाध्यक्षपदाची निवडणूक लोकशाही मार्गाने पार पडली आहे. त्यामुळे 'जी २३' चा हेतू सफल झाला आहे. पण निर्णयाला उशीर झाल्याने अनेक जण पक्ष सोडून गेले, असे सांगत, आता नवे अध्यक्ष झालेले मल्लिकार्जुन खरगे हे चांगले काम करतील. नजीकच्या काळात हिमाचल प्रदेश, गुजरात या राज्यांच्या निवडणुका होत आहेत. तर २०२४ ला लोकसभा निवडणुकांचे मोठे आव्हान काँग्रेससमोर आहे. त्याचा अभ्यास करूनच यापुढील वाटचाल होईल, असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
शिंदे-फडणवीस सरकार फार काळात टिकेल असे वाटत नाही
राज्यातील सरकारची स्थिती विदारक आहे. अजून मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकलेला नाही. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांचा वापर करून घेण्याचा भाजपचा डाव आहे. पण एकंदरीत परिस्थिती पाहता हे सरकार फार काळात टिकेल असे वाटत नाही, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. तसेच महाराष्ट्रात येत असलेल्या भारत जोडो यात्रेसाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले आहे. ही यात्रा तिरंगा झेंड्याखाली होत आहे. पण यात सहभागी व्हायची की नाही हा त्यांचा निर्णय राहील, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सन २०१४ साली राज्यातील आमचे सरकार पाडले नसते तर पुन्हा आमचेच सरकार सत्तेत आले असते. राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आणायला कोण कारणीभूत आहे, हे सर्वांना माहीत आहे अशी टीका नाव न घेता पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीवर केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"