गडकरींचे ‘ते’ विधान भाजपाला तंतोतंत लागू - अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 04:53 AM2019-01-29T04:53:58+5:302019-01-29T04:54:42+5:30
स्वप्ने दाखविणारा नेता लोकांना चांगला वाटतो, मात्र दिलेली आश्वासनं प्रत्यक्षात उतरली नाहीत, तर तेच लोक अशा नेत्यांना फटकावून काढतात, हे नितीन गडकरी यांचे विधान भाजपाला तंतोतंत लागू पडते, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी लगावला.
कोल्हापूर : स्वप्ने दाखविणारा नेता लोकांना चांगला वाटतो, मात्र दिलेली आश्वासनं प्रत्यक्षात उतरली नाहीत, तर तेच लोक अशा नेत्यांना फटकावून काढतात, हे नितीन गडकरी यांचे विधान भाजपाला तंतोतंत लागू पडते, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘परिवर्तन यात्रे’चा तिसरा टप्पा सोमवारी कोल्हापूरपासून सुरू झाला. दोन सभा केल्यानंतर अजित पवार यांनी सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, गडकरी जे बोलले ते लवकरच खरं होणार आहे. खोटी आश्वासनं देऊन सत्तेवर आलेल्या भाजपा नेत्यांना जनता फटकावून काढल्याशिवाय राहाणार नाही.
मुंबई महापालिकेतील मनसेचे नगरसेवक फोडण्यासाठी भाजपाने ३६ कोटी रुपये दिले. ही माहिती मला स्वत: राज ठाकरे यांनीच काल दिली, असा गौप्यस्फोटही पवार यांनी केला. शिवसेना-भाजपाने कितीही आरडाओरड केली तरी युती करण्याशिवाय त्यांना पर्याय नाही. ते एकत्र नाही आले तर काय अवस्था होईल, हे वेगळे सांगायची गरज नाही. त्यामुळे युती होणार, हे गृहित धरूनच आम्ही रणनीती आखली आहे, असेही पवार म्हणाले.