शरद पवार हे सदस्यच नाहीत तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष कसे? अजित पवार गटाचा युक्तिवाद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 07:20 AM2024-02-01T07:20:00+5:302024-02-01T07:20:55+5:30
NCP MLA disqualification Case: राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकारिणी सदस्यांची निवड घटनेनुसार झालेली नाही. शरद पवारांसह प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांची नेमणूक पक्षांतर्गत निवडणूक न घेता झाली. घटनेनुसार शरद पवार हे पक्षाचे सदस्य नाहीत, मग अध्यक्ष कसे होऊ शकतात, असा जोरदार युक्तिवाद अजित पवार गटाच्या वकिलांनी बुधवारी केला.
मुंबई - राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकारिणी सदस्यांची निवड घटनेनुसार झालेली नाही. शरद पवारांसह प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांची नेमणूक पक्षांतर्गत निवडणूक न घेता झाली. घटनेनुसार शरद पवार हे पक्षाचे सदस्य नाहीत, मग अध्यक्ष कसे होऊ शकतात, असा जोरदार युक्तिवाद अजित पवार गटाच्या वकिलांनी बुधवारी केला.
याच मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतचेची सुनावणीही पूर्ण झाली आहे. या प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय देणार, याचीच आता उत्सुकता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, १५ फेब्रुवारीआधीच हा निकाल येण्याची शक्यता आहे.
दोन्ही गटांच्या आमदारांची झाली उलटतपासणी
शरद पवार गटातील जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांची, तर अजित पवार गटाच्या सुनील तटकरे, अनिल पाटील यांची उलटतपासणी झाली. शरद पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा युक्तिवाद ॲड. शरण जगतियानी यांनी केल्यानंतर बुधवारी अजित पवार गटाच्या ॲड. प्रदीप संचेती यांनी पवारांच्या अध्यक्षपदावर प्रश्नचिन्ह निर्माण केले.4
दोन्ही गटांकडून केले दावे-प्रतिदावे
सरकारमध्ये पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनाही निर्णयासाठी मंत्रिमंडळासमोर जावे लागते. एक व्यक्ती मी अध्यक्ष आहे, मीच निर्णय घेऊ शकतो, असे म्हणू शकत नाही.
- ॲड. प्रदीप संचेती, (अजित पवार)
अजित पवार गटाच्या वकिलांनी पक्षांतर बंदी कायद्याचा अर्थच बदलून टाकला. यात राजकीय पक्षाला बगल देता येणार नाही तसेच पक्ष काेणता हे प्रथमदर्शनी ठरवावे लागणार आहे.
-ॲड. जगतियानी, (शरद पवार)
लेखी म्हणणे मांडण्याचे नार्वेकरांचे आदेश
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचा युक्तिवाद संपल्यानंतर सभापती राहुल नार्वेकर यांनी त्यांना शुक्रवारपर्यंत (दि. २) सायंकाळी ५ वाजेपर्यंत लेखी म्हणणे मांडण्याचे आदेश दिले.
- नार्वेकर यांनी दोन्ही गटांना त्यांच्या निवेदनातील १) राष्ट्रवादीची संघटनात्मक रचना काय असते? २) ती रचना सांगितल्यानंतर त्यात बहुमत कोणाला आहे? हे दोन मुद्दे स्पष्ट करण्याच्या सूचना दिल्या आहेत.