अजित पवारांमुळेच मी खासदार...; भावी मुख्यमंत्री विधानावरही अमोल कोल्हेंचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 10:16 AM2023-05-10T10:16:25+5:302023-05-10T10:17:20+5:30
अजितदादा आणि माझा खूप जवळचा संबंध आहे असं अमोल कोल्हे म्हणाले.
पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मागील अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. त्यात भावी मुख्यमंत्रिपदावरूनही नेत्यांमध्ये चढाओढ दिसली. नुकतेच खासदार अमोल कोल्हेंनी एका कार्यक्रमात जयंत पाटील हे राज्याचे आदर्श मुख्यमंत्री होऊ शकतात असं विधान केले होते. त्यावरून वाद झाला होता. मात्र मी केलेल्या विधानाचा कुठलाही वेगळा अर्थ काढू नका, मी खासदार अजित पवारांमुळेच आहे असा खुलासा खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे.
खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, शिरूर लोकसभा मतदारसंघातील लोकांच्या आशीर्वादाने आणि ही निवडणूक तितक्याच आपुलकीने अजित पवारांनी हाताळली होती. दादांचा मुलगा एकीकडे निवडणूक लढवतोय, जेवढे लक्ष मावळकडे होते तितकेच लक्ष जातीने अजितदादांनी शिरूर लोकसभेवर ठेवले होते. अन्यथा २२ दिवसात चेहऱ्यावर निवडणूक जिंकता येत नाही. अजितदादांनी यंत्रणा राबवली. अजितदादांचा हात असल्यानेच निवडणूक जिंकलो ही वस्तूस्थिती असते असं त्यांनी सांगितले.
तसेच अजितदादा की जयंत पाटील मुख्यमंत्री हा प्रश्न असता आणि मी ते उत्तर दिले असते तर आक्षेप घेता आला असता. परंतु जयंत पाटील यांच्या कार्यक्रमात गेलो होतो. तिथे भाषणात मी ते विधान केले. त्यामुळे या विधानाचा अर्थ कुणीही वेगळा काढू नये. अजितदादा आणि माझा खूप जवळचा संबंध आहे. दादांची प्रशासनावरील कमांड, पिंपरी चिंचवड शहरावरील प्रेम असेल. शिवसुराज्य यात्रेवेळी मला त्यांचा सहवास खूप लाभला असंही अमोल कोल्हे म्हणाले.
दरम्यान, २०१९ मध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची अनेकजण दंतकथा सांगतात. मी राष्ट्रवादीतून निवडणूक लढवणे हे सगळं प्लॅनिंग अजितदादांचे होते, अजितदादांनी शरद पवारांना सांगून हे करवून आणले. अमोल कोल्हे खासदार मतदारसंघातील जनतेमुळे आणि अजित पवारांनी राबवलेल्या यंत्रणेमुळे आहे असंही त्यांनी म्हटलं.