उद्या एखादी घटना घडली तर...; सुरक्षेत घट केल्यानंतर विरोधकांनी सरकारला घेरलं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 01:36 PM2022-10-29T13:36:49+5:302022-10-29T13:37:26+5:30
२०-२५ वर्ष आमदार, मंत्री म्हणून काम केले आहे. त्यांची सुरक्षा काढणे त्याला राजकीय रंग आहे असं वाटतं. अशी सुरक्षा काढून घेणे योग्य नाही असंही सतेज पाटील यांनी म्हटलं.
कोल्हापूर - राज्यातील काही नेत्यांची सुरक्षा कमी केल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. नाना पटोले, अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांचीही सुरक्षा कमी करण्यात आली आहे. त्यामुळे उद्या जर एखादी घटना घडली तर त्याला गृहमंत्रालय जबाबदार राहील अशा शब्दात काँग्रेस नेते आणि माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
सतेज पाटील म्हणाले की, राज्य गुप्तचर यंत्रणा हे धमकींचा आढावा घेते. त्यानंतर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली कमिटी त्याचा निर्णय घेते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, गटनेते बाळासाहेब थोरात, माजी गृहमंत्री जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार यांची सुरक्षा कमी करण्यात आलीय. या नेत्यांची सुरक्षा कमी करणे संशयास्पद वाटते. या नेत्यांच्या जीवाला धोका नाही हे रेकॉर्डवर आहे का? हे पाहावं लागेल. जर उद्या एखादी घटना घडली तर त्याला गृहखाते जबाबदार असेल असं त्यांनी म्हटलं.
त्याचसोबत निर्णय प्रक्रियेत या मंडळींनी काही निर्णय घेतलेले असतात जे काहींना आवडले नसतात. पण सुरक्षा व्यवस्था ही दाखवण्यासाठी नसते. निर्णय घेतल्यानंतर त्रुटी असतात, त्यासाठी सुरक्षा पुरवली जाते. माझ्या वैयक्तिक बाबतीत सुरक्षा काढण्याबाबत हरकत नाही. परंतु जी नावे पुढे येतात त्यांनी २०-२५ वर्ष आमदार, मंत्री म्हणून काम केले आहे. त्यांची सुरक्षा काढणे त्याला राजकीय रंग आहे असं वाटतं. अशी सुरक्षा काढून घेणे योग्य नाही असंही सतेज पाटील यांनी म्हटलं.
दरम्यान, सुरक्षा कोणाला कशी द्यायची याबाबत हायकोर्टाने निर्देश दिले आहेत. त्यामुळे सरकारच्या या निर्णयामुळे संशयास्पद भूमिका वाटते. नार्वेकरांना धमकी जास्त असेल किंवा त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी सुरक्षा वाढवली असावी. नियमाने त्यांची सुरक्षा वाढवली आहे का हे अभ्यास करणे गरजेचे आहे. सुरक्षेची मागणी करण्याची आवश्यकता नाही. गृहखात्याची ही जबाबदारी आहे. राज्यातील सुरक्षा राखणं ही जबाबदारी राज्य सरकारची आहे. त्यामुळे जो काही निर्णय घेतला असेल त्याला राज्य सरकार जबाबदार राहील असा इशारा सतेज पाटील यांनी दिला आहे.