काँग्रेस आमदार महायुतीच्या वाटेवर?; मंत्री छगन भुजबळांच्या भेटीनं पुन्हा चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 05:17 PM2024-05-30T17:17:17+5:302024-05-30T17:17:36+5:30

loksabha Election - ४ जूनच्या निकालानंतर अनेक नेते कोलांट्याउड्या मारतील असं सत्ताधारी आणि विरोधकांकडून बोललं जात आहे. त्यातच नाशिक येथे काँग्रेस आमदाराने भुजबळांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.

Igatpuri Congress MLA Hiraman Khoskar met Minister Chhagan Bhujbal, possibility of joining Mahayuti | काँग्रेस आमदार महायुतीच्या वाटेवर?; मंत्री छगन भुजबळांच्या भेटीनं पुन्हा चर्चा

काँग्रेस आमदार महायुतीच्या वाटेवर?; मंत्री छगन भुजबळांच्या भेटीनं पुन्हा चर्चा

नाशिक - इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी मंत्री छगन भुजबळांची भेट घेतली आहे. खोसकर-भुजबळ भेटीमुळे ते महायुतीच्या वाटेवर आहेत का अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. राज्यात नुकत्याच लोकसभा निवडणुका संपल्या. त्यानंतर आज हिरामण खोसकर यांनी भुजबळांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वी अजित पवारांनीही त्यांच्या भाषणात हिरामण खोसकर यांच्या नावाचा उल्लेख केला होता. त्यानंतर झालेल्या या भेटीनं अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. 

हिरामण खोसकर यांच्या महायुतीतील चर्चेबाबत याआधीही अनेकदा चर्चा झाली आहे. मात्र मंत्री असल्याने मी भुजबळांच्या भेटीला आल्याचं खोसकर म्हणाले. भुजबळ फार्म येथे ही भेट झाली. या भेटीनंतर खोसकर महायुतीत प्रवेश करणार अशी चर्चा रंगली. अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत अजित पवारांनी खोसकरांचं नाव घेतलं होते. हिरामण खोसकर हे इगतपुरी-त्र्यबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार आहेत. 

राष्ट्रवादीच्या कार्यकारणी बैठकीत अजित पवार म्हणाले होते की, नाशिक लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला हवी होती. त्याठिकाणी तसं नियोजनही झालं होतं. आपले आमदार माणिकराव कोकाटे, सरोज अहिरे यांच्या नावासोबत हिरामण खोसकर यांचाही उल्लेख दादांनी केला होता. त्यामुळे हिरामण खोसकर पुन्हा चर्चेत आले होते. या नावाच्या उल्लेखानंतर खोसकर यांनी आज छगन भुजबळांची भेट घेतली. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. 

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्यासमवेत काँग्रेसचे ११ आमदार भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यात नाशिक जिल्ह्यातील काँग्रेसचे एकमेव आमदार हिरामण खोसकर यांचेही नाव पुढे आले होते.  त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणातही खळबळ उडाली होती. तर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी खोसकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत मोठा दावा केला होता. शांत बसावे किंवा महायुतीच्या उमेदवाराला मदत करावी असा निरोप मुख्यमंत्र्यांकडून आल्याचा दावा हिरामण खोसकर यांनी केला होता. 

कोण आहेत हिरामण खोसकर?

इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत काँग्रेसला यश मिळालं होतं. याठिकाणच्या तत्कालीन आमदार निर्मला गावित यांच्या तिसऱ्या हॅटिट्रकच्या स्वप्नांना काँग्रेसचे उमेदवार हिरामण खोसकर यांनी सुरुंग लावला होता. काँग्रेसमधून शिवसेनेत केलेले पक्षांतर, सेना भाजप नेत्यांकडून अंतर्गत विरोधी काम ह्यामुळे निर्मला गावित यांना पराभव पत्करावा लागला. निर्मला गावित यांनी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी घेतली होती. निर्मला गावित यांची तिसरी हॅटिट्रक खोसकर यांनी खंडित केली होती.

Web Title: Igatpuri Congress MLA Hiraman Khoskar met Minister Chhagan Bhujbal, possibility of joining Mahayuti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.