"अनैतिक आणि असंवैधानिक शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारने राज्याचे वाटोळे केले’’, नाना पटोलेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 05:44 PM2023-09-03T17:44:25+5:302023-09-03T17:45:03+5:30
Nana Patole Criticize State Government: राज्यातील अनैतिक आणि असंवैधानिक शिंदे फडणवीस अजित पवार सरकारने राज्याचे वाटोळे केले आहे. दुष्काळामुळे राज्यातला शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे, असा टोला पटोले यांनी लगावला आहे.
राज्यातील सरकारविरोधात काँग्रेसने आजपासून जनसंवाद यात्रा सुरू केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज वर्धा जिल्ह्यातील आष्टी येथील शहीद स्मारकाला अभिवादन करून विदर्भातील जनसंवाद यात्रेला सुरुवात केली. यावेळी नाना पटोले यांनी राज्यातील सत्ताधारी शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. राज्यातील अनैतिक आणि असंवैधानिक शिंदे फडणवीस अजित पवार सरकारने राज्याचे वाटोळे केले आहे. दुष्काळामुळे राज्यातला शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे, असा टोला पटोले यांनी लगावला आहे.
यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राज्यातील अनैतिक आणि असंवैधानिक शिंदे फडणवीस अजित पवार सरकारने राज्याचे वाटोळे केले आहे. दुष्काळामुळे राज्यातला शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. त्याला कोणत्याही प्रकारची मदत दिली जात नाही. नोकर भरतीच्या नावाखाली राज्यातील बेरोजगार तरुणांची लूट सुरू असून, भरती परीक्षांचे पेपर फोडले जात आहेत.
आरक्षणाच्या मागणीसाठी शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन करणाऱ्या मराठा बांधवांवर, महिलांवर आणि लहान मुलावर या येड्यांच्या सरकारने लाठी हल्ला केला व हवेत गोळीबार केला. केंद्र सरकारने आरक्षणाची 50% मर्यादा वाढवली तर मराठा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सुटू शकतो. मात्र मराठा समाजाला आरक्षण देण्याची भाजपाची इच्छाशक्तीच नाही. जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी मागील काही महिन्यांमध्ये राज्यभरात विविध ठिकाणी सरकार पुरस्कृत दंगली घडवण्यात आल्या. आताही इंडिया आघाडीची बैठक मुंबईमध्ये सुरू असताना निष्पाप मराठा बांधवांवरती लाठी हल्ला करून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा सरकारचा प्रयत्न केला, असा आरोपही पटोले यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, जालन्यात मराठा बांधवांवर पोलिसांनी केलेला लाठी हल्ला हा सरकार पुरस्कृत असून सरकारच्या आदेशाशिवाय पोलीस अमानुषपणे असा हल्ला करू शकत नाहीत. जनतेच्या समस्या सोडवण्याऐवजी हे सरकार राज्यात जातीय धार्मिक तेढ निर्माण करून राज्याला मणिपूर प्रमाणे अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.