’’राहुल गांधींची जात विचारून केला SC, ST, OBCचा अपमान; मोदींनी माफी मागावी’’, काँग्रेसची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 06:31 PM2024-08-01T18:31:39+5:302024-08-01T18:34:15+5:30
Nana Patole Criticize Narendra Modi & BJP : राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणना करण्याची मागणी लावून धरली आहे, म्हणूनच चिडून भाजपाच्या खासदाराने लोकसभेत राहुल गांधी यांची जात विचारली. भाजपाने जात विचारून फक्त राहुल गांधी यांचाच अपमान केला नसून एससी, एसटी, भटक्या विमुक्त, आदिवासी, मागास तसेच ओबीसी समाजाचा भाजपाने अपमान केला आहे.
मुंबई - लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे देशातील बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवत आहेत. त्यांनी जातनिहाय जनगणना करण्याची मागणी लावून धरली आहे, म्हणूनच चिडून भाजपाच्या खासदाराने लोकसभेत राहुल गांधी यांची जात विचारली. भाजपाने जात विचारून फक्त राहुल गांधी यांचाच अपमान केला नसून एससी, एसटी, भटक्या विमुक्त, आदिवासी, मागास तसेच ओबीसी समाजाचा भाजपाने अपमान केला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाने या समाजाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
टिळक भवन येथे पत्रकारांनी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राहुल गांधींना जात विचारल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जसा संताप आहे तसाच बहुजन समाजामध्येही भाजपाविरोधात तीव्र संताप आहे. काँग्रेस कार्याकर्त्यांनी आज रस्त्यावर उतरून राज्यभर आंदोलन केले व भाजपाच्या या मनुवादी वृत्तीचा जाहीर निषेध केला. जात विचारणाऱ्या भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांची माफी नको, असे राहुल गांधी म्हणाले आहेत. कितीही अपमान केला, शिव्या दिली तरी बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी लढत राहणार व जातनिहाय जनगणना करणार यावर राहुल गांधी ठाम आहेत. अनुराग ठाकूरच्या विधानाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समर्थन केले हे अत्यंत गंभीर आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज जिल्हा मुख्यालयी आंदोलन करत भाजपा व खासदार अनुराग ठाकूर यांचा निषेध केला.
दरम्यान, राज्यातील कायदा सुव्यवस्था अत्यंत बिघडलेली आहे. सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराच्या गाडीवर हल्ला करण्यात आला तर आज विरोधी पक्षाच्या आमदाराच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. राज्यातील आमदारच सुरक्षित नाहीत. देवेंद्र फडवणीस हे राज्याला लाभलेले आतापर्यंतचे सर्वात निष्क्रीय व दुबळे गृहमंत्री आहेत. पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी व गृहमंत्री यांचा खालच्या पोलीसांवर प्रचंड दबाव आहे. रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालक पदावर अवैध नियुक्ती करण्यात आली असून त्या भाजपासाठी काम करत आहेत. राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडण्यास गृहमंत्री व पोलीस महासंचालकच जबाबदार असून दोघांनीही राजीनामा द्यावा, असे नाना पटोले म्हणाले.
पत्रकाराच्या एका प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमध्ये उपवर्गीकरण करण्याच्या मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागतच आहे परंतु सरकार या निर्णयाची अंमलबजावणी करेल की नाही याबाबत शंका आहे. दुसरीकडे भाजपा सरकार एससी, एसटींना ओबीसी प्रमाणे क्रीमी लेअरची मर्यादा घालून आरक्षण संपवण्याचा प्रयत्न करत आहे असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.