आणखी १ आमदार सोबत, अजित पवारांची मोठी खेळी; शरद पवारांसह अमोल कोल्हेंनाही धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 09:53 PM2024-01-25T21:53:06+5:302024-01-25T21:54:09+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांचा माणूस हा अजित पवारांच्या मागे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. हा निर्णय माझा वैयक्तिक नाही, जनतेच्या हितासाठी घेतला आहे.
जुन्नर - राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीपासून आतापर्यंत कुठल्याही गटात न गेलेल्या तटस्थ आमदाराने अखेर निर्णय घेत अजित पवारांच्या नेतृत्वात काम करण्याचं जाहीर केले. शिरुर लोकसभा मतदारसंघातील या आमदाराच्या निर्णयानं शरद पवारांसह विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनाही मोठा धक्का मानला जात आहे. अमोल कोल्हे यांनी उघडपणे शरद पवारांसोबत जात अजित पवारांवर शेतकरी आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून सातत्याने टीकास्त्र सोडले. त्यानंतर आज अजित पवार शिरुर मतदारसंघातील जुन्नर तालुक्यात विकासकामांच्या उद्घाटनाला गेले होते. त्याठिकाणी जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी आपण अजित पवारांसोबत असल्याचे जाहीर केले.
या मेळाव्यात आमदार अतुल बेनके म्हणाले की, मी लोकप्रतिनिधी आहे. तुमचा सेवक आहे. ती सेवा करण्याच्या दृष्टीने लोकप्रतिनिधीचे जी काही कर्म आहेत ती केल्याशिवाय गत्यंतर नाही. जनतेची सेवा करणे हीच आमची पूजा आहे. जनतेची सेवा करण्याचा मार्ग कोणता असेल तर ते अजितदादांशिवाय दुसरा पर्याय नाही. अजितदादांनी जी भूमिका घेतली त्यात त्यांनी पक्षाचे धोरण सोडले नाही. त्यामुळे अजितदादांच्या नेतृत्वात जुन्नर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवास यापुढच्या काळात ताकदीने भविष्यात करावा लागणार आहे. या तालुक्यासाठी अजितदादांनी जे जे काही केले ते नक्कीच वाखणण्याजोगे आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच मी आमदार झाल्यापासून अनेक राजकीय गोष्टी अगदी जवळून पाहिल्या. या सर्व गोष्टी आमच्यासारख्या सामान्यांच्या डोक्याच्या बाहेरच्या आहेत. पण मी ज्या गोष्टी बारकाईने पाहिलेल्या आहेत. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत मी सर्वांना सांगतो. अजित पवार हा सच्चा माणूस आहे. प्रत्येक जुन्नरचा आमचा शेतकरी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांचा माणूस हा अजित पवारांच्या मागे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. हा निर्णय माझा वैयक्तिक नाही. हा निर्णय घेताना जनतेच्या हिताचे काय त्यादृष्टीने आपल्याला पुढे जायचे आहे. त्यामुळे भविष्यातील अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी अजितदादा पवार हे जिल्ह्याला लाभलेले खंबीर नेतृत्व आहे असंही आमदार अतुल बेनके यांनी म्हटलं.
दरम्यान, मी फुले शाहू आंबेडकर विचारांचा, बहुजनांचा विचार करणारा आणि शेतकऱ्यांचा लोकप्रतिनिधी आहे. जी शिकवण आम्हाला यशवंतराव चव्हाण, शरद पवार, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, वल्लभ बेनके यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थित्यंतराच्या अनेक बातम्या आल्या. त्यात काय करावे हा प्रश्न मला होता. पण जेव्हा प्रश्नाला सामोरे जात होतो, माझी भूमिका लोकांसमोर मांडली. मला साहेब असो वा अजितदादा यांनी कुठलीही जबरदस्ती केली नाही. मी कुठलीही भूमिका न घेता तटस्थ राहिलो तरी अजितदादांनी आपल्यावर आणि जुन्नरकरांवर कधीही प्रेम कमी केले नाही. जसे शरद पवार हे शेतकऱ्यांचे नेते आहेत. तसेच शेतकऱ्यांचा आश्वासक चेहरा म्हणून जनता अजित पवारांकडे पाहत आहे. अजितदादांनी जी भूमिका घेतली ती राज्याच्या हितासाठी घेतली. जुन्नर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा तुमच्या नेतृत्वाखाली भविष्यात डौलाने फडकल्याशिवाय राहणार नाही असा शब्द मी अजितदादांना देतो असंही आमदार अतुल बेनके यांनी स्पष्ट सांगितले.