"इंदिरा गांधींनी जनता पक्षाचा पराभव केला होता त्याप्रमाणे राहुल गांधीही भाजपाला पराभूत करून पंतप्रधान होतील’’
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 06:28 PM2023-03-24T18:28:41+5:302023-03-24T18:29:18+5:30
Rahul Gandhi: दिवंगत इंदिरा गांधी यांनी अशाच प्रकारच्या व्यवस्थेचा सामना केला होता. आता राहुल गांधी सुद्धा त्याच व्यवस्थेचा सामना करत आहेत.
सूरतमधील कोर्टाने राहुल गांधींना दोषी ठरवून त्यांना दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर राहुल गांधींवर अपात्रतेची कारवाई करत लोकसभा अध्यक्षांनी त्यांचं सभासदत्व रद्द केलं आहे. या निर्णयानंतर काँग्रेस आणि विरोधी पक्षांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. दरम्यान, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही त्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. अत्याचारी व्यवस्थेला तोंड देत इंदिरा गांधी जनता पक्षाचा पराभव करत पुन्हा देशाच्या पंतप्रधान झाल्या होत्या. राहुल गांधीसुद्धा भाजपाचा पराभव करून देशाचे पंतप्रधान होतील, असे विधान बाळासाहेब थोरात यांनी केले.
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याचे समजात त्याचे पडसाद विधिमंडळात उमटले. महाविकास आघाडीने या घटनेचा निषेध करत सभात्याग केला आणि विधानभवनच्या पायऱ्यावर काळ्या फिती लावून मोदी सरकारचा धिक्कार केला. यावेळी बोलताना काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय हा लोकशाहीवरील हल्ला आहे. भारत जोडो यात्रेनंतर भारतीय जनता पक्ष राहुलजी गांधी यांना जास्तच घाबरू लागला आहे. लोकसभेत राहुलजी गांधी यांनी अदानी-मोदी संबंधाचा मुददा उपस्थित केला होता, त्यातूनच भाजपाने सुडबुद्धीने कारवाई केली आहे, असे ते म्हणाले.
केंब्रिज विद्यापीठातील विधानावर लोकसभेत बोलू दिले नाही, त्यांचा माईक बंद करण्यात आला. देशाची वाटचाल लोकशाहीकडून हुकूमशाहीकडे चालली आहे याचा हा पुरावा आहे. दिवंगत इंदिरा गांधी यांनी अशाच प्रकारच्या व्यवस्थेचा सामना केला होता. आता राहुल गांधी सुद्धा त्याच व्यवस्थेचा सामना करत आहेत. पण या अत्याचारी व्यवस्थेला तोंड देत इंदिरा गांधी यांनी जनता पक्षाचा पराभव करत पुन्हा देशाच्या पंतप्रधान झाल्या. आता राहुल गांधीसुद्धा भाजपाचा पराभव करून देशाचे पंतप्रधान होतील असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला.