शिवसेना नेते शिवाजी आढळराव पाटील २६ मार्चला करणार अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 12:58 PM2024-03-23T12:58:40+5:302024-03-23T13:00:41+5:30
Shivajirao Adhalrao Patil : राज्यात मिशन ४५ प्लस यासाठी सर्व मतभेद बाजूला सारून आम्ही एकदिलाने काम करणार असा विश्वास शिवाजी आढळराव पाटील यांनी व्यक्त केला.
मुंबई - शिरुर मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हाती घेणार आहेत. शिरुर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून आढळराव पाटील यांचं नाव आघाडीवर होते. त्यात महायुतीत ही जागा अजित पवारांच्या गटाला देण्यात आली आहे. त्यामुळे शिवाजी आढळराव पाटील गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी चर्चा होती. त्याला आज दुजोरा मिळाला आहे. अजितदादांच्या भेटीनंतर आढळराव पाटलांनी येत्या २६ मार्च रोजी राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचं सांगितले आहे.
शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांशी बोलणं झाले आहे. या दोन्ही नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांचीही चर्चा केली. त्यामुळे २६ मार्चला पक्षप्रवेश करण्याला मला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. ज्याअर्थी मी पक्षप्रवेश करतोय त्याअर्थी उमेदवारी मिळणार का हे प्रश्न विचारण्याची गरज नाही. मी लोकसभेला उभा राहणार आहे. माझ्या जनतेला १०० टक्के खात्री आहे मी यंदा जिंकणार असं त्यांनी सांगितले.
तसेच मी पहिली निवडणूक ३० हजारांच्या मताधिक्याने, दुसरी १ लाख ८० हजार तर तिसरी ३ लाख ८० हजारांच्या मताधिक्याने जिंकलो. चौथी निवडणूक ही सर्व निवडणुकांचे रेकॉर्ड तोडेल. आम्हाला महायुतीतील घटक पक्षांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर बसवण्यासाठी अबकी बार ४०० पार आणि राज्यात मिशन ४५ प्लस यासाठी सर्व मतभेद बाजूला सारून आम्ही एकदिलाने काम करणार असा विश्वास शिवाजी आढळराव पाटील यांनी व्यक्त केला.
दरम्यान, आमची महायुती आहे. तिन्ही पक्षांनी जे ठरवलं आहे, त्यामुळे कुणी पळवला वैगेरे असं नाही. महायुतीचा उमेदवार म्हणून आम्ही सगळे काम करणार आहोत असंही आढळराव पाटील यांनी म्हटलं आहे. शिरूर मतदारसंघात सध्या विद्यमान खासदार अमोल कोल्हे आहेत. राष्ट्रवादी फुटीनंतर कोल्हे अजितदादांसोबत येतील असं बोललं जात होते. मात्र काही काळाने कोल्हे यांनी आपण शरद पवारांसोबत कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आता शिरूर मतदारसंघात कोल्हेविरुद्ध आढळराव पाटील असा थेट सामना पाहायला मिळू शकतो.