'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 09:32 AM2024-11-19T09:32:50+5:302024-11-19T09:35:51+5:30
'जी आकडेवारी मी देत आहे ती वेगवेगळ्या टप्प्यांवर आहे पण गुंतवणूक होणार हे नक्की झाले आहे', असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींनी उत्तर दिले.
मुंबई : थेट परकीय गुंतवणूक आणि देशांतर्गत गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात गेल्या अडीच वर्षांत क्रमांक एकवरच आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणते उद्योग गेल्या दोन-अडीच वर्षांत आले, त्यातून किती कोटींची गुंतवणूक आली आणि किती रोजगार मिळणार आहेत याचा लेखाजोखा दिला.
एखादा उद्योग दुसऱ्या राज्यात गेला म्हणून विरोधक ओरड करतात. तमिळनाडू, कर्नाटक, गुजरातसह बरीच राज्ये स्पर्धेत असतानाही या उद्योगांनी महाराष्ट्राला पसंती दिली, त्या विषयी बोला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे गुंतवणुकीबाबतचे आरोप निराधार असल्याचे सांगत ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी आकडेवारी दिली.
गुजरातला उद्योग पळाले, सात लाख कोटींची गुंतवणूक तिकडे गेली असे बेछूट आरोप केले जात आहेत, हा नवा फेक नरेटीव्ह आहे, गुजरात थेट परकीय गुंतवणुकीबाबत सहाव्या सातव्या क्रमांकावर आहे आणि महाराष्ट्र क्रमांक एकवर आहे. जी आकडेवारी मी देत आहे ती वेगवेगळ्या टप्प्यांवर आहे पण गुंतवणूक होणार हे नक्की झाले आहे, असे ते म्हणाले. प्रकल्पांची यादी खूप मोठी आहे. फक्त उदाहरणादाखल काहींचा उल्लेख मी करत आहे, असेही फडणवीस म्हणाले.
फडणवीस यांचे राहुल गांधींना सवाल
पाच मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून गेले असे म्हणता अन् उदाहरणे तीनच प्रकल्पांचीच देता हे कसे?
टाटा एअर बस आणि वेदांताने गुजरातला जाण्याचा निर्णय मविआ सरकारच्याच काळात झाला, याची आपल्याला कल्पना आहे का?
टोयोटोने कर्नाटकला जाण्याचा रद्द करून अलिकडेच त्यांनी महाराष्ट्रात प्रकल्प उभारण्याचे जाहीर केले, याबद्दल आपण काहीच का नाही बोलत?
आयफोनचा ७५ हजार रोजगार देणारा प्रकल्प महाराष्ट्रातून गेला असे आपण म्हणता, ७५ हजार हा हवेतला आकडा आणला कुठून?