सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2024 05:57 PM2024-11-17T17:57:05+5:302024-11-17T17:58:50+5:30

खुल्या मनाने निवडणूक लढवा पण कसला रडीचा डाव अशी टीका अजित पवारांनी शरद पवार गटावर केली. 

Maharashtra Assembly Election 2024 - Ajit Pawar criticizes MP Amol Kolhe in a meeting in Shirur | सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला

सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला

शिरूर - सतत निष्ठा बदलणारा ही व्यक्ती त्याने स्वाभिमानाच्या गोष्टी कराव्यात याला नैतिक अधिकार आहे का? तुम्ही छत्रपती संभाजीराजे, छत्रपती शिवाजीराजे भूमिका करता, सगळ्यांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. मात्र टीका करून शिरूरच्या लोकांचे प्रश्न सुटणार आहेत का? असा सवाल करत अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा राजकीय इतिहासच काढला.

शिरूरच्या सभेत अजित पवार म्हणाले की, अलीकडे काहींना फार उत्साह आलेला आहे त्यात आपले खासदार, मी आजपर्यंत दुर्लंक्ष करत होतो परंतु रोज कुठलीही सभा असली की गुलाबी जॅकेट बोलतो. माझं जॅकेट गुलाबी नाही, तुमचा चष्मा बदला, जांभळ खाल्ल्यानंतर जी बी असते त्याचा रंग तो आहे. सारखी टीका करतोय. आमच्या निष्ठेबद्दल बोलतो. तुम्ही आमची निष्ठा काढावी? निष्ठेबद्दल हे बोलतायेत, आधी राज ठाकरेंकडे गेले, त्यानंतर त्यावेळच्या शिवसेनेत प्रवेश केला, भाषणाची सुरूवात करताना पहिल्यांदा उद्धव ठाकरेसाहेब आपल्याला मानाचा मुजरा अशी करायचा. सगळे रेकॉर्ड काढा असा टोला त्यांनी लगावला.

तसेच २०१४ साली शिवाजी आढळराव पाटील उमेदवार होते, तेव्हा शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून याने काम केले. शिवसेनेच्या वर्धापन दिनी ते म्हणाले लोकसभेत खिळखिळ्या झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीला पूर्ण संपवूया. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला न मागता शरद पवारांनी पाठिंबा दिला तेव्हा अमोल कोल्हे म्हणाले, २ अधिक २ सांगत ५ करणारे शरद पवार आहेत. ते भाजपाला शून्य करतील. भाजपाला शिवसेनेने पाठिंबा दिला ते अमोल कोल्हेंनी स्वीकारला. सोयीचे राजकारण केले. ५ वर्षात उद्धव ठाकरेंनी तिकीट दिले नाही, ज्यांना ते मानाचा मुजरा करायचे त्यांना जय महाराष्ट्र केला. ज्यांच्यावर बेभरवशाचे टीका करायचे त्यांच्याच पक्षात आले. मी माझ्या गाडीत घेऊन गेलो, तिथे उमेदवारी दिली. भाजपासोबत सत्ता भोगली, उद्धव ठाकरेंना मानाचा मुजरा गेला, राष्ट्रवादीत आम्ही जो निर्णय घेतला तेव्हा हे माझ्यासोबत होते, शपथविधीलाही उपस्थित होते अशी आठवणही अजित पवारांनी करून दिली.

आमदार पुत्राच्या अपहरणावरही केले भाष्य

दरम्यान, आमदाराच्या मुलाला काहींनी त्रास दिला, छळ केला अशी बातमी वाचली. त्यात माऊली कटकेंवर आरोप लावले. निवडणुकीत भावनिक मुद्दा करून लोकांची मते मिळवण्यासाठी जर काही लोक इतक्या खालच्या थराला जात असतील तर हे दुर्दैव आहे. खुल्या मनाने निवडणूक लढवा पण कसला रडीचा डाव अशी टीका अजित पवारांनी शरद पवार गटावर केली. 

अजित पवारांनी घटनाक्रम सांगितला
    
९ नोव्हेंबर २०२४ शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मांडवगड येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार अशोक पवार यांचा प्रचार सुरू होता. त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते प्रमुख आरोपी भाऊसाहेब कोळपे यांनी उमेदवाराचे चिरंजीव ऋषिराज पवार यांना पक्षात काही लोकांचा प्रवेश करायचा आहे असं सांगून एका बंगल्यात नेले, त्या बंगल्यात हा आरोपीने काही अश्लील व्हिडिओ बनवला आणि हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी भाऊसाहेबांनीच त्याला दिली आणि पैशाची मागणी केली. त्यामुळे हा गुन्हा दाखल झाला. त्यात बदनामी आमची करण्यात आली. मला कळल्यानंतर संबंधितांना सांगितले, कठोर तपास करा, कुणीही असेल सोडायचा नाही. आमचे चुकले असेल तर आम्ही चूक मान्य करू. ३ आरोपी या गुन्ह्यात अटक केले. भाऊसाहेब कोळपे यांनी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी हे केले असं कबूल केले आहे. माझे पीडीसीसी बँकेचे १५ लाखाचे कर्ज आहे त्यातून मी गुन्हा केला. भाऊसाहेब कोळपे लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटात प्रवेश केला. या गुन्ह्यातील मोबाईल आणि व्हिडिओ जप्त केले. या गुन्ह्यात कुठलाही राजकीय उद्देश दिसून येत नाही हे तपासात उघड झाले असं अजित पवारांनी सभेत सांगितले. 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 - Ajit Pawar criticizes MP Amol Kolhe in a meeting in Shirur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.