'बंटेंगे तो कटेंगे'... योगी आदित्यनाथ ठरणार निवडणुकीत 'ट्रम्प कार्ड', PM मोदींपेक्षा जास्त सभा घेणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 02:18 PM2024-11-05T14:18:39+5:302024-11-05T14:20:54+5:30
Maharashtra Assembly Election 2024 : नरेंद्र मोदींच्या जाहीर सभा ८ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. तर ६ नोव्हेंबर रोजी राहुल गांधी आरएसएसचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरातून निवडणूक प्रचाराला सुरुवात करणार आहेत.
Maharashtra Assembly Election 2024 : मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. निवडणूक प्रचाराला आता वेग आला असून काँग्रेस, भाजपसह सर्वच पक्षांच्या स्टार प्रचारकांचे दौरे सुरू झाले आहेत. अनेक बडे नेते पुढील १३ दिवस महाराष्ट्राचा झंझावाती दौरा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात ११ सभा घेणार आहेत. नरेंद्र मोदींच्या जाहीर सभा ८ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. तर ६ नोव्हेंबर रोजी राहुल गांधी आरएसएसचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरातून निवडणूक प्रचाराला सुरुवात करणार आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी १८ ऑक्टोबरला सायंकाळी निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यापूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपचे 'ट्रम्प कार्ड' साबित झालेले योगी आदित्यनाथ मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात १५ निवडणूक सभांना संबोधित करणार आहेत. योगी आदित्यनाथ हे पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा जास्त प्रचार सभांना हजेरी लावतील. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांची महाराष्ट्रातील उपस्थिती आणि 'बंटेंगे तो कटेंगे' या घोषणेचा परिणाम राज्यातील विधानसभा निवडणुकीतही दिसून येईल, असे जाणकारांचे मत आहे.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या हरयाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत योगी आदित्यनाथ यांचा करिष्मा दिसून आला. योगी आदित्यनाथ यांचा जम्मू-काश्मीरमध्ये स्ट्राइक रेट ९० टक्के आणि हरयाणामध्ये जवळपास ६५ टक्के होता. जम्मूमध्ये योगींनी पाच विधानसभा मतदारसंघात निवडणूक रॅली घेतल्या, त्यापैकी चार जागा भाजपने जिंकल्या. किश्तवाड आणि कठुआसारख्या मुस्लिमबहुल जागा जिंकण्यात भाजपला यश आले.हरयाणातही योगी आदित्यनाथ यांनी २० विधानसभा मतदारसंघात प्रचार केला, त्यापैकी १३ जागा भाजपने जिंकल्या.भाजपला हरयाणात तिसऱ्यांदा सत्तेत आणण्यासाठी हा विजय महत्त्वाचा ठरला.
हरयाणा ते कॅनडापर्यंत 'बंटेंगे तो कटेंगे'च्या घोषणा
योगी आदित्यनाथ यांनी हरयाणाच्या निवडणुकीतच 'बंटेंगे तो कटेंगे'ची घोषणा केली होती. ही घोषणा इतकी लोकप्रिय झाली की भाजप समर्थकांनी मतदान नसलेल्या राज्यातही त्याचा वापर करण्यास सुरुवात केली. याशिवाय, कॅनडात झालेल्या मंदिरावरील हल्ल्यानंतर हिंदू समुदायाने आपल्या निदर्शनावेळी 'बंटेंगे तो कटेंगे' अशा घोषणा दिल्या. तसेच, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर मुंबईसह राज्याच्या अनेक भागात योगी आदित्यनाथ यांचे फोटो असलेले 'बंटेंगे तो कटेंगे'चे पोस्टर लावण्यात आले होते.