ठरलं ! मोदी, राहुल यांच्या सभांनी प्रचाराचा धुरळा उडणार, पंतप्रधानांच्या १० प्रचार सभा, धुळे-नाशिकपासून प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2024 07:09 AM2024-11-03T07:09:38+5:302024-11-03T07:10:16+5:30

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी माघारीचे दोनच दिवस उरले असताना महायुती शाह व महाविकास केंद्रीय आघाडीने प्रचाराच्या रणधुमाळीची जोरदार तयारी केली आहे.

Maharashtra Assembly Election 2024: Decided! Narendra Modi, Rahul Gandhi's meetings will blow away campaign dust, Prime Minister's 10 campaign meetings, starting from Dhule-Nashik | ठरलं ! मोदी, राहुल यांच्या सभांनी प्रचाराचा धुरळा उडणार, पंतप्रधानांच्या १० प्रचार सभा, धुळे-नाशिकपासून प्रारंभ

ठरलं ! मोदी, राहुल यांच्या सभांनी प्रचाराचा धुरळा उडणार, पंतप्रधानांच्या १० प्रचार सभा, धुळे-नाशिकपासून प्रारंभ

 नागपूर - विधानसभा निवडणुकीसाठी माघारीचे दोनच दिवस उरले असताना महायुती शाह व महाविकास केंद्रीय आघाडीने प्रचाराच्या रणधुमाळीची जोरदार तयारी केली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी बुधवारी (दि. ६), नागपुरात संविधान संमेलनाला उपस्थित राहतील तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराचा धडाका शुक्रवारपासून (दि. ८) सुरू होईल. पंतप्रधानांच्या १० प्रचारसभांचे नियोजन भारतीय जनता पक्षाने केले असून धुळे-नाशिक येथून प्रचाराला सुरुवात होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित या स्टार प्रचारकांसोबत विविध मंत्री, अन्य राज्यांचे मुख्यमंत्रीदेखील प्रचारात उतरणार आहेत. सद्यस्थितीत दहा सभांचे नियोजन करण्यात आले असले तरी यात वाढ होण्याचीदेखील शक्यता आहे. प्रत्येक सभा ही त्या त्या भागातील १५ ते २० मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करणारी असेल. तेथील सर्व उमेदवार सभास्थळी राहतील, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

- मोदी यांच्या ८ नोव्हेंबरला धुळे व नाशिक येथे पहिली सभा होतील
- दुसऱ्या दिवशी, शनिवारी अकोला व नांदेड येथे त्यांची सभा होईल 
- १२ नोव्हेंबर रोजी चंद्रपूर, सोलापूर व पुणे येथे आणि १४ नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर, मुंबई व नवी मुंबई येथे सभा आयोजित करण्यात आली आहे.

नागपुरात ६ नोव्हेंबरला संविधान संमेलनात राहुल गांधी येणार
ओबीसी युवा अधिकार मंच संघटनेतर्फे ६ नोव्हेंबर रोजी नागपुरात संविधान संमेलनआयोजित करण्यात आले असून या संमेलनात काँग्रेस नेते राहुल गांधी सहभागी होणार आहेत, अशी माहिती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. बुधवारी सायंकाळी महाविकास आघाडीची संयुक्त सभा मुंबईत बीकेसी मैदानावर होणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्या सभेला संबोधित करण्याआधी राहुल गांधी यांचे निवडणूक प्रचारातील पहिले संबोधन या संविधान संमेलनात होणार आहे.

वडेट्टीवार यांनी सांगितले की, ओबीसी युवा अधिकार मंच संघटनेचे उमेश कोराम, अनिल जयहिंद यांनी हा कार्यक्रम आयोजित केला असून त्यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करून राहुल गांधी या संमेलनात सहभागी होण्याचे मान्य केले आहे. सुरेश भट सभागृहात बुधवारी सकाळी ११ वाजता हे संमेलन होईल. या संमेलनात 'मनुवाद, संविधान, मनुस्मृती महिलांचे स्थान काय, शिवशाही आणि मनुस्मृतीमध्ये किती फरक आहे, या विषयांवर चर्चा होणार आहे. राज्यातील विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी संमेलनात सहभागी होतील. या संमेलनाला कुठलेही राजकीय स्वरुप नाही. काँग्रेसकडून कुणालाही निमंत्रित करण्यात आले नाही.

आदर्श आचारसंहितेचे कुठलेही उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमानंतर राहुल गांधी हे दुपारी २ वाजता मुंबईसाठी रवाना होतील. तेथे काँग्रेसतर्फे जनतेला दिलेल्या पाच गॅरंटीचे प्रकाशन होईल. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राहुल गांधी विदर्भासह महाराष्ट्रात प्रचार सभा घेणार आहेत. त्याच्या तारखा लवकरच जाहीर करू, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, आ. विकास ठाकरे, आ. अभिजित वंजारी, प्रदेश उपाध्यक्ष नागा गावंडे, अनिल जयहिंद, उमेश कोराम आदी उपस्थित होते.

अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे धडे हा धोका
कार्यक्रमाचे आयोजक अनिल जयहिंद म्हणाले की, महाराष्ट्रात अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे धडे दिले जाणार आहेत, हा देशाला मोठा धोका आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलण्याचा डाव आहे. संविधानाने आपले रक्षण केले आहे. देशातील प्रत्येक माणसाला संविधानामुळे हक्क मिळाले. आता संविधान बदलून मनुस्मृती आणली तर काय होईल, ही भीती लोकांच्या मनात आहे.

उद्धव ठाकरे ५ तारखेपासून राज्य दौऱ्यावर
उद्धव ठाकरे यांच्या प्रचारदौऱ्याचा प्रारंभ हा कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातून ५ नोव्हेंबरपासून होणार आहे. मुंबईत १७ नोव्हेंबर रोजी त्यांच्या प्रचाराची सांगता सभा नियोजित आहे. या काळात साधारणपणे २५ जाहीर सभा होणार असल्याची माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिली.

Web Title: Maharashtra Assembly Election 2024: Decided! Narendra Modi, Rahul Gandhi's meetings will blow away campaign dust, Prime Minister's 10 campaign meetings, starting from Dhule-Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.