पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 07:15 PM2024-11-16T19:15:48+5:302024-11-16T19:16:44+5:30

राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा पत्रकारांकडून निषेध नोंदवण्यात येत आहे

Maharashtra Assembly Election 2024 Journalists are slaves Rahul Gandhi statement in Amravati Journalists expressed outrage | पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप

पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप

Maharashtra Assembly Election 2024: अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांची शनिवारी जाहीर सभा झाली. या सभेत पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करताना राहुल यांनी मीडियालच लक्ष्य केले. राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याबाबत आता पत्रकारांनी संताप व्यक्त केला आहे. पत्रकारांचा असा पाणउतारा करणे योग्य नसल्याचे पत्रकरांनी म्हटलं आहे.

"मागच्या वर्षभरापासून संविधान, जातनिहाय जनगणना आणि ५० टक्के आरक्षण मर्यादेची भिंती तोडणार, लोकसभेत हे करून दाखविणार असे सांगत आहे. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राहुल गांधी आरक्षणाच्या विरोधात असल्याचे सांगत आहेत. त्यांची मेमरी लॉस झाली आहे. त्यांच्यासमोरच हे सर्व मुद्दे मांडत असतानाही त्यांना याचा विसर पडला आहे. हे सर्व मीडियावले दाखवित नाही. हे सर्व त्यांचेच आहेत. हे मी जेव्हा म्हणतो तेव्हा हे सर्व माझ्याकडे पाहून हसतात. आम्ही त्यांचेच असल्याचे सांगत हसतात. तुमचे नाहीच असेही सांगतात. त्यांची चूक नाही. हे मला आवडतात. पण, त्यांना पगार घ्यायचा आहे. मुलांचे शिक्षण करायचे आहे. त्यांच्या पोटाची भूक शमवायची आहे. हे करण्यासाठी त्यांना मालकांचे ऐकावेच लागते. एक तऱ्हेने हे गुलाम आहेत. त्यामुळे यांच्याशी माझी लढाई नाही. हे आमचे काहीही दाखविणार नाही. २४ तास मोदी दाखविणार. मी म्हणालेले काहीही दाखविणार नाही. उलट सायंकाळी मोदी यांची मेमरी खूप मस्त आहे. एखादी गोष्ट ऐकल्यानंतर ७० वर्षे विसरत नाहीत. त्यात पुन्हा जोडतील," असं राहुल गांधी यांनी म्हटलं.

"लहान असताना मोदी तलावात मगरीशी लढले होते. मगरीला त्यांनी बुडविले. पण, जेव्हा हेच मोदी गंगा नदीवर जातात तेव्हा त्यांना पोहता येत असल्याचे जाणवत नाही," अशी टीकाही त्यांनी केली.

दरम्यान, राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा पत्रकारांकडून निषेध नोंदवण्यात येत आहे. "आपण लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहात. आपण सत्ताधाऱ्याविरुद्ध आवाज उठवण्याचे काम करणे अपेक्षित आहे. मात्र आपण पत्रकारांविरुद्धचा आवाज उठवत आहात, त्यांना गुलाम म्हणत आहात. वर्षानुवर्षे निष्ठेने आपली लेखणी जिझवणाऱ्या तमाम पत्रकारांचा हा जाहीर अपमान आहे. आपल्या विधानाचा आम्ही जाहीर निषेध करतो," असं महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष प्रकाश कुलथे यांनी म्हटलं 

"समाजाच्या समस्या चव्हाट्यावर आणणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यापेक्षा आपण प्रत्येक सभेत पत्रकारांना गुलाम म्हणता. ग्रामीण व शहरी भागातील सर्वच पत्रकार आपल्या या विधानाने कमालीचे दुखावलेले आहेत. राजकारणात तुम्ही कोणत्या पक्षावर टीका करायची कसे बोलायचे हा तुमचा अधिकार आहे पण तुमच्या व कोणत्याही पक्षाच्या राजकारणाशी घेणेदेणे नसणाऱ्या पत्रकारांचा असा जाहीरपणे पाणउतारा करणे योग्य नाही," असेही कुलथे यांनी म्हटलं.
 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 Journalists are slaves Rahul Gandhi statement in Amravati Journalists expressed outrage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.