राहुल गांधींनीच मला आणि सुजयला पक्षाबाहेर ढकललं; राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 04:34 PM2024-11-14T16:34:29+5:302024-11-14T16:35:30+5:30
नगर जिल्ह्यातील राजकारणात अस्थिरता आणि विखे-थोरात संघर्षामागे शरद पवारांचा हातभार, विखे पाटलांचा आरोप
मुंबई - राहुल गांधी यांनी मला आणि सुजयला पक्षाबाहेर ढकललं. सुजयच्या निवडणुकीवेळी त्याला राष्ट्रवादीकडून उभे राहायला राहुल यांनी सांगितले. जागांची अदलाबदल करावी असं आम्ही म्हणत होतो. नगर दक्षिणची निवडणूक सलग ३ वेळा राष्ट्रवादी हरली होती. मी शरद पवारांना दोनदा भेटलो ते म्हणाले माझे कार्यकर्ते ऐकत नाही. त्यानंतर मी राहुल गांधींना भेटलो, खरगेही तिथे होते. सुजय राष्ट्रवादीकडून का लढत नाहीत असं राहुल गांधींनी सांगितले. काँग्रेसचे अध्यक्षच असं बोलत असतील तर पुढे काय करायंच. मग आम्ही भाजपात प्रवेश केला असा गौप्यस्फोट राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.
एका मुलाखतीत राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, राहुल गांधी यांच्या भेटीनंतर मी सुजयला फोन केला, तू देवेंद्र फडणवीसांशी बोलून निर्णय घे. जिथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवारांचे ऐकत नाही. तिथे आम्ही राष्ट्रवादीचं तिकिट घेऊन लढायचं याचा अर्थ राजकीय आत्महत्या केल्यासारखे आहे असं त्यांनी म्हटलं. एबीपी माझाच्या मुलाखतीत राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करत विखे पाटील-थोरात संघर्षाला शरद पवारांना जबाबदार धरलं.
भाऊसाहेब असे पर्यंत जिल्ह्यात संघर्षाची स्थिती नव्हती. त्यानंतर राजकीय स्थिंत्यातरे झाली. काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस निर्माण झाली. शरद पवारांचा राजकीय घडामोडींना हात होता. नगर जिल्ह्यात विखे पाटील आणि थोरात यांचा संघर्ष तीव्र करण्यात शरद पवारांचा हातभार लागला. त्यामुळे हे चित्र आज पाहायला मिळतंय. पहिल्यापासून आमच्या वडिलांचा आणि शरद पवारांचा संघर्ष झाला. जिल्ह्यात जोपर्यंत राजकीय अस्थिरता निर्माण करत नाही तोवर त्यांचेही जिल्ह्यात राजकीय गणित साध्य होणार नव्हते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पक्षातील नेत्यांना आमच्या वडिलांविरोधात भूमिका घ्यायला लावली. शरद पवारांच्या राजकारणाला बाळासाहेब बळी पडले. त्यातून संघर्ष आणखी वाढत गेला असा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.
दरम्यान, बाळासाहेब थोरातांना आता निर्णयाचे अधिकार द्यायला हवेत त्यांच्या हातात राज्य दिले तर शेतीपासून अनेक प्रश्न सुटण्यास मदत होईल असं विधान शरद पवारांनी राहाता येथील प्रचारसभेत केले. तरुणांच्या रोजगाराची मोठी समस्या आहे. शेतीत अनेक प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवायचे असतील तर बाळासाहेब थोरातांना तुम्ही निर्णयाचे अधिकार द्यायला हवेत. मी काही विधानसभेत जाणार नाही. थोरात तिथे आहेत. राज्यात कृषिमंत्री म्हणून त्यांनी देशातील इतर कृषिमंत्र्यांच्या तुलनेने सर्वोत्तम काम केले असं सांगत पवारांनी बाळासाहेब थोरातांचं कौतुक केले आहे.