उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा यशस्वी?; काँग्रेस-शरद पवारांसोबत जागावाटप ते रणनीती यावर चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 11:28 PM2024-08-08T23:28:30+5:302024-08-08T23:29:31+5:30
उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह मागील ३ दिवसांपासून दिल्ली दौऱ्यावर होते. या दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी इंडिया आघाडीतील प्रमुख नेत्यांची भेट घेतली.
नवी दिल्ली - महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. प्रत्येक पक्ष आपापली रणनीती आखत आहे. त्यात मुंबईचा मातोश्री बंगला जे कधीकाळी महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्रबिंदू राहिले आहे. जिथे आज उद्धव ठाकरे राहतात. बाळासाहेब ठाकरे असताना या बंगल्यावर मोठमोठ्या नेत्यांची रिघ असायची. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. उद्धव ठाकरेंनी मातोश्रीहून बाहेर पडत थेट दिल्ली गाठली आहे.
३ दिवसीय दिल्ली दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच ठाकरे-गांधी अशी ही भेट होती. भाजपासोबत युती तुटल्यापासून ठाकरे आणि गांधी कुटुंब एकमेकांच्या जवळ आले आहे. उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधी यांच्या घरी जाऊन भेट घेतली तर मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी राहुल गांधी, केसी वेणुगोपाल यांच्यासोबत चर्चा केली.
त्यातच धारावीच्या प्रकल्पावरून शरद पवारांना उद्धव ठाकरेंनी टोला लगावला होता. पवार आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीत अदानींच्या धारावी प्रकल्पावर चर्चा झाल्याचं बोलले गेले. मात्र दिल्लीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली. त्याचसोबत दिल्ली दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांचीही भेट घेतली. केजरीवालांच्या आई वडिलांची विचारपूस केली. जवळपास ३० मिनिटे उद्धव ठाकरे केजरीवालांच्या घरी होते.
उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यात काय काय झालं?
- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत दिल्लीत राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत महत्त्वाची बैठक पार पडली.
- पुढील महिन्याच्या आत जागावाटप केलं जावं, त्यावरही चर्चा झाली
- कोण किती जागा लढणार यावर सर्वांची सहमती झाली पाहिजे, जर काही जागांवर तिन्ही पक्षांनी दावा केला तर एकत्र बसून तोडगा काढला जाईल
- जागावाटपानंतर सर्वांनी मजबुतीने एकसाथ प्रचारासाठी पुढे यायला हवं.
- लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विभागवार आकड्यांच्या आधारे सर्वाधिक मतांची टक्केवारीला प्राधान्य दिलं जावं.
- प्रत्येक पक्षाने सर्व्हे केलेत, परंतु सर्व्हेसोबतच प्रत्येक पक्षाच्या ताकदीचा हवाला घेत जागावाटप व्हावं
- निवडणुकीनंतरच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा अंतिम होईल
- महाराष्ट्रात ठाकरे, पवार आणि काँग्रेससोबतच सपा आणि आपसारख्या पक्षांची मदत घेतली जाईल.
- भाजपाला हरवणं हे एकमेव उद्दिष्ट महाविकास आघाडीचे असेल यावर सर्वांचे एकमत झाले.
- शरद पवार - उद्धव ठाकरे यांच्या भेटीत अदानी आणि धारावी प्रकल्पाबाबत असलेले गैरसमज, मतभेद दूर झाल्याचं बोललं जाते.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत १०० ते ११० जागांवर उद्धव ठाकरे उमेदवार उतरवण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी पुढील महिनाभरात जागावाटपावर एकमत व्हावं असं टार्गेट निश्चित करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निवडणुकीपूर्वी ठरण्याची शक्यता कमी असल्याचंही बोललं जाते.