“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 06:38 PM2024-11-12T18:38:51+5:302024-11-12T18:41:55+5:30

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: पंतप्रधान मोदींनी संविधान वाचलेच नाही. उद्योगपतींना १६ लाख कोटींची कर्जमाफी देणाऱ्या मोदींनी देशातील एकाही शेतकऱ्याची कर्जमाफी का केली नाही?, अशी विचारणा राहुल गांधी यांनी केली आहे.

maharashtra assembly vidhan sabha election 2024 congress mp rahul gandhi criticizes bjp pm narendra modi and rss in gondia rally | “मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: शेतकऱ्यांच्या हितासाठीच शेतकरी कायदे आणले होते, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असतात पण ते काळे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे होते तर शेतकरी रस्त्यावर कशासाठी उतरले होते? भाजपाचे सरकार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या धान, सोयाबीन, कापसाला भाव देत नाही. देशातील काही उद्योगपतींचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्जमाफ करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ११ वर्षांत एकाही शेतकऱ्याची कर्जमाफी का केला नाही? मोदी हे अदानी-अंबानींचे आहेत, ते अंबानीच्या लग्नात गेले पण मी गेलो नाही कारण मी तुमचा आहे, असे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांची गोंदियात जाहीर सभा झाली. या सभेत राहुल गांधी यांनी भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS वर हल्लाबोल केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला ओबीसी असल्याचे सांगत असतात आणि त्याच ओबीसींचा सातत्याने अपमान करतात. ओबीसी समाजाची लोकसंख्या ५० टक्के असताना मोदी सरकार त्यांच्यावर फक्त ५ टक्के खर्च करते, हा खरा ओबीसी समाजाचा अपमान आहे. म्हणूनच जातनिहाय जनगणना करण्याचा काँग्रेसचा निर्धार आहे तसेच आरक्षणावरील ५० टक्के मर्यादा हटवण्याचा प्रयत्न आहे, असा निर्धार राहुल गांधी यांनी बोलून दाखवला. 

पंतप्रधान मोदींनी देशाचे हे संविधान वाचलेच नाही

देशाच्या संविधानात हजारो वर्षापासूनचे विचार आहेत, भगवान बुद्ध, संत बसवेश्वर, महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर यांचे विचार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत, संतांचे विचार आहेत, या संविधान समानता, प्रेम, सर्व धर्मांचा आदर आहे पण हे लाल रंगाचे संविधान दाखवले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावर टीका करतात. या संविधानात लोकांना मारणे, गरीब, शेतकरी यांच्यावर अन्याय, अत्याचार करावे, असे कुठेही लिहिलेले नाही. पंतप्रधान मोदींनी देशाचे हे संविधान वाचलेच नाही. भाजपा, आरएसएस व नरेंद्र मोदी २४ तास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानावर हल्ले करून ते संपवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि काँग्रेस मात्र या संविधानाच्या रक्षणासाठी लढत आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, काँग्रेसने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत. छत्तीसढमध्ये धानाला ३ हजार रुपये भाव देण्याचे आश्वासन दिले, त्याची पूर्तता केली आहे. कर्नाटकमध्ये महिलांना मोफत बस प्रवास सुरु केला आहे, महालक्ष्मी योजना सुरु केली आहे. महाराष्ट्रात मविआचे सरकार आल्यास दर महिन्याला महिलांच्या बँक खात्यात ३ हजार रुपये खटाखट, खटाखट जमा केले जातील, शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस, धानाला बाजारात योग्य भाव मिळावा यासाठी प्रयत्न करु, २५ लाखांचा आरोग्य विमा, तरुणांना ४ हजारांचा भत्ता व २.५ लाख सरकारी नोकऱ्यांची भरती करु, असे आश्वासन देत नरेंद्र मोदी मुठभर अरबपतींना जेवढे पैसे देतील तेवढे पैसे काँग्रेस सरकार गरिबांना देईल, असा शब्द राहुल गांधी यांनी दिला.
 

Web Title: maharashtra assembly vidhan sabha election 2024 congress mp rahul gandhi criticizes bjp pm narendra modi and rss in gondia rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.