“लाखो रोजगार गुजरातला, राज्याचे किती कोटींचे प्रकल्पही गेले?”; राहुल गांधींनी आकडाच सांगितला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 03:20 PM2024-11-14T15:20:17+5:302024-11-14T15:27:09+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: कोणते प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातसह अन्य ठिकाणी गेले, त्यातून किती रोजगार महाराष्ट्राचा बुडाला, याची थेट आकडेवारीच राहुल गांधी यांनी दिली.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचारसभा, बैठका यांना वेग येत आहे. विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबरला होणार आहे तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते आमचेच सरकार येणार असल्याचा दावा करताना पाहायला मिळत आहेत. काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दौरे करत आहेत. महाराष्ट्रातून किती कोटींची गुंतवणूक गुजरातला गेली आणि त्यामुळे राज्यातील किती लाखांचा रोजगार गुजरातला गेला, याबाबत राहुल गांधी यांनी आकडेवारी दिली.
नंदुरबार येथील सभेत बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीकास्त्र सोडले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संविधान बद्दल काहीच माहिती नसून संविधानाचा कोणताच अभ्यास त्यांचा नाही. देश संविधानानुसार चालतो. काँग्रेस पक्ष संविधानाच्या विचारावर चालतो. संविधानाला हजारो वर्षाची परंपरा असून थोर संत ,आदिवासी क्रांतिकारक यांचे विचार या संविधानामध्ये आहेत. संविधानामध्ये क्रांतिकारकाची आत्मा आहे. याला खोटे म्हणण्याचे काम नरेंद्र मोदी करत आहेत. संविधानामुळे आदिवासींना आदिवासी म्हणून संबोधले जाते. आदिवासी देशाचे पहिले मालक असून जल, जंगल, जमीन यांवर आदिवासी समाजाच्या अधिकार आहे. भाजपा आणि पंतप्रधान मोदी आदिवासींना त्यांच्या मूळ हक्कापासून दूर ठेवण्याचे काम करत असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली.
लाखो रोजगार गुजरातला, राज्याचे किती कोटींचे प्रकल्पही गेले?
भारताच्या ९० महत्त्वाच्या अधिकाऱ्यांमध्ये फक्त १ आदिवासी अधिकारी आहे आणि त्यांनाही मागे बसवले जाते, असा दावाही राहुल गांधी यांनी केला. तसेच वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प होता, त्यामधून दहा हजार रोजगार निर्मिती होणार होती. १.२ लाख कोटींचा हा प्रकल्प होता, हा प्रकल्प महाराष्ट्र सरकारने गुजरातला पाठला. टाटा एअरबस मॅन्युफॅक्चरिंग प्रकल्पातून दहा हजार रोजगार निर्मिती होणार होती. मात्र, हा १.८ लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला नेण्यात आला. आयफोन निर्मितीचा २ लाख कोटींचा प्रकल्प ज्यामधून ७५ हजार युवकांना रोजगार मिळाला असता, तो प्रकल्प गुजरातला पाठवून दिला. आणखी एका प्रकल्पातून ८० हजार जणांना रोजगार मिळणार होता तो गुजरातला गेला. गेल पेट्रो केमिकल प्रोजेक्ट ७ हजार कोटींचा प्रकल्प होता. यामधून २१ हजार नोकऱ्यांची निर्मिती होणार होती. हा प्रकल्प दुसरीकडे पाठवण्यात आला. हे सर्व मिळून विचार केलास राज्यातील ५ लाख नोकऱ्या दुसरीकडे या सरकारने पाठवल्या. त्यामुळे तुम्हाला नोकऱ्या मिळत नाहीत आणि हे काम इंडिया आघाडी करणार नाही, असा दावा राहुल गांधी यांनी केला.
दरम्यान, तुमच्या राज्यामध्ये तुम्हाला रोजगार मिळाला पाहिजे, यासाठी आम्ही निवडणूक लढवत आहोत. ही लढाई संविधानासाठी सुरू असून जे मिळते ते सर्व संविधानानेच मिळते. या संविधानाचा अपमान भाजपाकडून केला जात आहे. फुले, आंबेडकर, गांधींचा अपमान ही लोक करत आहेत, या शब्दांत राहुल गांधी यांनी निशाणा साधला.