PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2024 05:44 PM2024-11-17T17:44:05+5:302024-11-17T17:47:37+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आव्हानानंतर राहुल गांधी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबरला होणार आहे तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रचारासाठी शेवटचे काही तास राहिले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीचे राज्यातील आणि केंद्रातील नेते जोरदार प्रचार करताना पाहायला मिळत आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले आव्हान काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी स्वीकारले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी एक पोस्ट राहुल गांधी यांनी केली आहे.
महाराष्ट्रात प्रचार करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका करताना ठाकरे गटावरही निशाणा साधला. तसेच काँग्रेसने आतापर्यंत कधी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल कौतुकोद्गार काढले नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल दोन चांगले शब्द ठाकरे गट राहुल गांधींना सांगू शकतो का, काँग्रेसने बाळासाहेब ठाकरेंची स्तुती करावी, राहुल गांधींनी दोन शब्द तरी त्यांची स्तुती करावी, असे आव्हान पंतप्रधान मोदी यांनी दिले होते. राहुल गांधी यांनी हे आव्हान स्वीकारत बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा १२ वा स्मृतीदिन आहे आहे. यानिमित्ताने देशभरातील अनेक नेते, दिग्गज बाळासाहेब ठाकरे यांच्या अभिवादन करत आहेत. शिवाजी पार्क या ठिकाणी असलेल्या समाधीस्थळी जाऊन उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना अभिवादन केले. यानंतर राहुल गांधी यांनी एक्सवर बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल एक पोस्ट लिहिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या १२व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. आम्ही उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संपूर्ण शिवसेना परिवारासोबत आहोत, असे राहुल गांधी यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, या पोस्टनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांना एक आव्हान दिले आहे. ही चांगली गोष्ट आहे. आजवर त्यांनी असे बोलण्याचा प्रयत्न केला नव्हता. शिवसेनेबाबत त्यांच्या मनात काय भावना आहेत, ते माहिती नाही. पण हिंमत असेल तर त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना हिंदुहृदयसम्राट म्हणून दाखवावे, कारण असे संबोधन स्वतः उद्धव ठाकरे हेही करत नाहीत, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
Remembering Balasaheb Thackeray ji on his 12th death anniversary. My thoughts are with Uddhav Thackeray ji, Aditya and the entire Shiv Sena family.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 17, 2024