धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 05:25 PM2024-11-16T17:25:41+5:302024-11-16T17:27:22+5:30
Rahul Gandhi Speech: सर्व महापुरुषांचे विचार या संविधानात आहेत. प्रधानमंत्री आणि त्यांची टीम लपून संविधानाची हत्या करतात, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली.
महाराष्ट्र निवडणुकीची ही लढाई विचारधारेची आहे. एकीकडे महायुती दुसरी कडे महाविकास आघाडी. आपला देश संविधानाने चालला पाहिजे पण पंतप्रधान म्हणतात ते केवळ पुस्तक आहे. सर्व महापुरुषांचे विचार या संविधानात आहेत. प्रधानमंत्री आणि त्यांची टीम लपून संविधानाची हत्या करतात, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली.
अमरावतीत गांधी यांची सभा होती. यामध्ये त्यांनी अजित पवारांच्या अदानी-शाह-फडणवीस-पवार बैठकीच्या वक्तव्यावरही टीका केली. ज्या बैठकीत अमित शाह, अदानी बसले होते ती बैठक सरकार चोरी करण्याची होती. करोड रुपये देऊन आमदार खासदार यांना खरेदी करायचे असे संविधानात कुठे लिहिले आहे. हे भाजपाचे लोक, मोदी, शाह धारावीची गरिबांची जमीन त्यांचा मित्र गौतम अदानी यांना देणार होते. यामुळेच यांनी सरकार चोरी केले, अदानींना जमीन देण्यासाठीच आमदार खरेदी केले, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
मोदी म्हणतात की राहुल गांधी आरक्षण विरोधी आहे. मोदींची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. मोदी तोडू न शकलेली 50 टक्के आरक्षणाची भिंत आम्हाला तोडायची आहे. मोदींना मेमरी लॉस झालेला आहे. नरेंद्र मोदी जातीय जनगणनेच्या विरोधात आहेत. भारतात 200 मोठ्या कंपन्या आहेत. पण एकही मालक हा मागसवर्गीय नाही. मोठमोठ्या खाजगी शाळा, दवाखाने पाहिले तर त्यातही एकही मागासवर्गीय मालक नाही. धारावी जमीन अदानींकडे देत असाल तर शेतकऱ्यांसाठी देखील सरकारने काम केले पाहिजे. २५ अब्जाधीशांचे १६ लाख कोटी माफ केले गेले. हे सरकार जर अब्जाधीशांना पैसे देऊ शकते तक आम्ही शेतकरी, मजुरांना का देऊ शकत नाही, असा सवाल गांधी यांनी केला.