महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 11:56 PM2024-10-20T23:56:12+5:302024-10-20T23:58:51+5:30
विदर्भात एकूण ६२ जागा आहेत त्यातील १२-१४ जागा आम्हाला मिळाल्याच पाहिजेत. १२-१४ जागा आम्हाला मिळणार नसतील तर आघाडी कशाला म्हणायची..? असा सवाल भास्कर जाधवांनी उपस्थित केला.
चिपळूण - महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटला नाही. त्यात राज्यातील काँग्रेस नेते दिल्लीत आहेत तर इथं ठाकरे गट आणि शरद पवारांच्या भेटीगाठी सुरू आहेत. विदर्भातील जागांवरून ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात प्रचंड रस्सीखेच सुरू आहे. त्यात ठाकरे गटाचे पूर्व विदर्भाचे संपर्कप्रमुख भास्कर जाधव यांनी काँग्रेसला जुन्या गोष्टींची आठवण करून देत जास्त ताणलं तर तुटूही शकते असा सल्ला दिला आहे.
भास्कर जाधव म्हणाले की, काही लोकांची प्रवृत्ती, कार्यपद्धती असते, माझं ते माझं आणि तुझं तेही माझं... माझ्याकडे पूर्व विधानसभा क्षेत्र आहे, त्यात २८ विधानसभेच्या जागा आहेत. त्यात २०१९ च्या निकालात १४ काँग्रेस राष्ट्रवादीकडे आणि १४ भाजपा शिवसेनेने जिंकल्या आहेत. त्यामुळे १४ जागांवर आमचा हक्क आहे. परंतु त्यातील ८ ते १० जागा आम्ही मागितल्या आहेत. मित्रपक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे जागावाटपाचं घोडं अडलं आहे. महाविकास आघाडी तुटावी अशी शिवसेनेची आणि उद्धव ठाकरेंची अजिबात इच्छा नाही. सर्वांनी मिळून तुटेपर्यंत ताणू नका असं त्यांनी सांगितले आहे. परंतु एका बाजूने आपण उभे राहिलो आणि दुसऱ्या बाजूने सातत्याने ताणत असेल, मी जागेवर राहिलो, ताणलं नाही आणि कुणीतरी दुसऱ्या बाजूने ताणत असेल तर तुटूही शकते. विदर्भात एकूण ६२ जागा आहेत त्यातील १२-१४ जागा आम्हाला मिळाल्याच पाहिजेत. १२-१४ जागा आम्हाला मिळणार नसतील तर आघाडी कशाला म्हणायची..? १२ ते १४ जागा आम्हाला मिळाव्यात त्यातील पूर्व विदर्भात ८ जागा मिळाव्यात असा माझा आग्रह आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच आघाडी आणि युती होतच राहतील परंतु पक्ष टिकला पाहिजे. जर कुणाला वाटत असेल एखादा पक्ष अडचणीत आहे, तर त्याचा फायदा घेऊन या पक्षाला अधिक अडचणीत आणावा असा कुणाचा मनसुबा असेल, कुणाच्या मनात हेतू दडलेला असेल तर प्रत्येकाला आपापला पक्ष टिकवण्याचा आणि वाढवण्याचा अधिकार आहे. लोकसभेनंतर काँग्रेस मोठ्या भावाच्या भूमिकेत गेला असं वाटत असेल तर २०१९ ला काँग्रेस छोट्या भावाच्या भूमिकेत होता हे मान्य करावे लागेल. १ जागा आली होती, ती खासदाराच्या निधनानं रिक्त झाली त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत काँग्रेस झीरो होती. आता ती जर मोठी झाली असेल तर २०१९ चा फॉर्म्युला बघावा लागेल. २०१९ ला काँग्रेस राज्यात चौथ्या क्रमांकावर होती. त्यामुळे उद्या काय होईल यापेक्षा आता डोळ्यासमोर परिस्थिती काय हे प्रत्येकाने घेऊन पुढे चालले पाहिजे असा सल्ला आमदार भास्कर जाधव यांनी दिला आहे.
दरम्यान, जागावाटपाचा तिढा महाराष्ट्रातील नेत्यांसोबत सुटणार कसा, हा तिढा दिल्लीतील नेत्यांसमोर बसून सुटायला हवा होता. परंतु ते न झाल्याने हा तिढा सुटलेला नाही. एकीची ताकद असते, पण एकीची महत्त्व ज्यांना कळत नाही त्यांना काळ हे उत्तर असते. जे काही चाललंय याचा फायदा विरोधकांना होतोय का, विरोधकांची आयती पोळी भाजली जाईल का...राज्यातील जनतेने हे सरकार उलथवून टाकण्याचं ठरवलं आहे हे आम्हाला मान्य आहे की नाही. जनतेच्या भावनेचा आदर करायचा की नाही हे वाद घडवू पाहतायेत त्यांनी ठरवायचं आहे असा अप्रत्यक्षपणे भास्कर जाधव यांनी काँग्रेस नेत्यांवर प्रहार केला आहे.