"सकाळी ८ वाजता फोन आला तसं ५०० जण मुंबईला सोबत आले.."; हिरामण खोसकर काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 07:06 PM2024-10-21T19:06:45+5:302024-10-21T19:08:22+5:30
उमेदवारी यादी जाहीर करण्यापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षातील काही नेत्यांना, विद्यमान आमदारांना एबी फॉर्म वाटप सुरू केले आहे.
मुंबई - विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर प्रत्येक राजकीय पक्षांमधील हालचालींना वेग आला आहे. उमेदवार यादी जाहीर करण्यापासून एबी फॉर्म वाटपापर्यंत नेत्यांची धावपळ सुरू झाली आहे. त्यातच अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवार यादी जाहीर होण्यापूर्वीच एबी फॉर्म वाटप सुरू झालं आहे. त्यात काँग्रेसमधून राष्ट्रवादीत आलेले आमदार हिरामण खोसकर यांनाही अजितदादांच्या पक्षाकडून एबी फॉर्म मिळाला आहे.
माध्यमांशी बोलताना हिरामण खोसकरांनी म्हटलं की, एक एक आमदार आले एबी फॉर्म घेऊन गेले, आम्हाला एबी फॉर्म देताना ५०० माणसं आली आहेत, त्यामुळे निवडणुकीचा काय विषय राहलाय...सकाळी ८ वाजता बंगल्यावरून अजितदादांचा फोन आला. तुम्हाला बोलावलंय, शक्यतो एबी फॉर्म द्यायची तयारी आहे. नुसतं हे माहिती झालं तसं जवळजवळ ५०० लोक सोबत आलेत. ५०० पैकी २५० सरपंच, नेते आणि कार्यकर्ते असल्यामुळे माझ्यासारख्याला उचललं आणि जाऊन देवळात बसायचं आहे अशी विनोदी शैलीत त्यांनी प्रतिक्रिया दिली.
तसेच एबी फॉर्म कधी भरायचा हे ठरवू. मी फॉर्म घेतलाय, नेत्यांनी निवडून आणायचाय...मी शिपाई म्हणून काम करतोय. कोणत्या दिवशी फॉर्म भरायचा हे दादा सांगतील. त्यानुसार पुढे कामाला लागू. अजितदादांनी मतदारसंघात कामाला लागण्याच्या सूचना दिल्यात. सगळेच नेते एकाबाजूला आले तर काँग्रेसमध्ये ५ जणच राहिलेत. ते ग्रामपंचायतीतही निवडून येत नाहीत. अख्खा तालुका आपल्या बाजूने आहे. माझ्या मागे सैन्य आहे त्यामुळे घाबरायचं कारण नाही असं आमदार हिरामण खोसकर यांनी विश्वास व्यक्त केला.
दरम्यान, कमीत कमी २ महिने आम्ही काँग्रेसकडे, महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे आमचं म्हणणं मांडत होतो, परंतु पक्ष ऐकायलाच तयार नव्हता. त्यावेळी कार्यकर्ते, नेत्यांनी एकजूटीने निर्णय केला, जर उमेदवारी नाही दिली तर आपल्याला हे फसवतील म्हणून सर्व सरपंच, उपसरपंच आणि कार्यकर्ते यांच्या आग्रहास्तव महायुतीत आम्ही प्रवेश केला असं आमदार हिरामण खोसकरांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी काँग्रेसकडून पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे हिरामण खोसकर यांचं ६ वर्षासाठी पक्षातून निलंबन केले होते. त्यानंतर खोसकरांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला. इगतपुरी मतदारसंघात महायुतीकडून हिरामण खोसकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.