Maharashtra Government: अजित पवारांनी 'त्या' बैठकीत दिले होते भाजपासोबत जाण्याचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 04:14 PM2019-11-25T16:14:24+5:302019-11-25T16:16:15+5:30
अजित पवारांच्या भूमिकेला ३ वरिष्ठ नेत्यांचं समर्थन
मुंबई: राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी आठ दिवसांपूर्वीच भाजपासोबत जाण्याचे संकेत दिले होते. राष्ट्रवादीनं भाजपासोबत जाऊन राज्याला स्थिर सरकार द्यावं, अशी भूमिका १७ नोव्हेंबरला पुण्यात झालेल्या पक्षाच्या बैठकीत अजित पवारांनी मांडली होती. मात्र राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शिवसेनेसोबत जाऊन भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याची भूमिका मांडून त्यासाठी हालचाली सुरू केल्या, असं वृत्त 'इंडियन एक्स्प्रेस'नं दिलं आहे.
राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते असलेल्या अजित पवार यांनी भाजपासोबत सरकार स्थापन करण्याची भूमिका मांडली होती. शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अजित पवारांनी हे मत व्यक्त केलं होतं. या बैठकीनंतर लगेचच राष्ट्रवादीनं शिवसेनेला सोबत घेऊन सरकार स्थापन करण्याचे सूतोवाच केले. अजित पवारांसोबतच खासदार सुनील तटकरे, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांनीदेखील भाजपासोबत जाण्याची भूमिका मांडली. यापैकी तटकरे आणि मुंडे अजित पवारांचे कट्टर समर्थक मानले जातात.
अजित पवारांनी मांडलेल्या भूमिकेला इतर नेत्यांनी विरोध केला. त्यामुळे शरद पवारांनी अजित पवारांच्या भूमिकेकडे फारसं लक्ष दिलं नाही. यानंतर शरद पवारांनी काँग्रेस आणि शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याची तयारी सुरू केली. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर राष्ट्रवादीनं विरोधी पक्षात बसण्याची भूमिका घेतली होती. मात्र शिवसेना आणि भाजपामधील दुरावा वाढताच शरद पवारांनी काँग्रेस नेतृत्त्वाची भेट घेतली. शिवसेनेला सोबत घेऊन सरकार स्थापन केल्यास भाजपाला सत्तेपासून दूर ठेवता येईल, अशी भूमिका पवारांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींकडे मांडली. याला सोनिया गांधींनी हिरवा कंदील दाखवला.