Maharashtra Government: आमचं कुटुंब एक आहे आणि शेवटपर्यंत एकच राहील- रोहित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 09:36 AM2019-11-27T09:36:48+5:302019-11-27T09:41:58+5:30
राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या.
मुंबईः राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना सोबत घेऊन शनिवारी 23 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील आज (26 नोव्हेंबर) मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अजित पवार पुन्हा राष्ट्रवादी आणि पवार कुटुंबामध्ये परतले. या सर्वच प्रकारावर राष्ट्रवादी आमदार आणि अजितदादांचे पुतणे रोहित पवार यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, सुरुवातीला जेव्हा अजितदादांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली ते टीव्हीवर बघितलं तेव्हा विश्वास बसत नव्हता की, हे कसं झालं. शेवटी त्या खोलात माझ्यासारखा कार्यकर्ता गेला नाही. कुटुंब म्हणून थोडासा संभ्रम होता. काय होणार हे कळत नव्हतं. पण त्यातच कुठेतरी हा विश्वास होता की दादा पुन्हा परततील. आम्ही दादांना मनापासून ओळखतो. एवढ्या वादाच्या काळातही दादांनी अनेक लोकांचे आणि कुटुंबीयांचे फोन घेतले होते. कुटुंबाला दुर्लक्षित करून चालत नाही हे आमच्या कुटुंबाला माहीत आहे. आमचं कुटुंब एक आहे आणि शेवटपर्यंत एकच राहील. कालचा दिवसच गोड होता. दादा परत एकदा साहेबांना भेटले ही गोड बातमी आहे, असं म्हणत रोहित पवारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
ते म्हणाले, मी सातत्यानं सांगतोय पवारांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो, दादांची काम करण्याची जी पद्धत आणि क्षमता आघाडीसाठी अतिशय महत्त्वाची आहे. दादा आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी परत येतील, अशी अपेक्षा त्यावेळी आम्ही केली होती. काल दादा साहेबांना भेटले ते पाहून कुटुंबातील व्यक्ती म्हणून आनंद झालाच. पण एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून जास्त आनंद झाला. अजित पवार भाजपाबरोबर गेल्यानंतर पवार साहेब अस्वस्थ होते. पवार साहेब अस्वस्थ असले तरी ते अस्वस्थ आहेत, असं दाखवत नाहीत.
NCP MLA Rohit Pawar (grand nephew of NCP chief Sharad Pawar) at the assembly in Mumbai: We are happy that Ajit Pawar has come back. He is also here today. He is a part of NCP. Going forward, we would work under his guidance. #Maharashtrapic.twitter.com/cLx7R5KQk9
— ANI (@ANI) November 27, 2019
रोहित पवार यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपाची स्टाईल ही तोडाफोडीची आहे, भाजपानं ती स्टाइल लागू करण्याचा प्रयत्न केला. दादांनाही ती स्टाइल योग्य वाटत नसल्यानंच दादा उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत परतले, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे.