Maharashtra CM: आता अजित पवारांचे काय होणार? उद्धव ठाकरेच ठरवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 12:46 PM2019-11-27T12:46:58+5:302019-11-27T12:48:10+5:30
अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर फडणवीस यांनीही राजीनामा दिल्याने शिवसेनेसमोरील मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग मोकळा झाला होता.
मुंबई : शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये किमान समान कार्यक्रमावरील चर्चा अंतिम टप्प्यात आली आणि उद्या सत्तास्थापनेचा राज्यपालांकडे करायला जाणार त्याच रात्री अजित पवारांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. यामुळे आधीच एकदा राज्यपालांच्या सदनातून पाठिंब्याचे पत्र न मिळाल्याने माघारी परतलेल्या शिवसेनेला पुन्हा तोंडघशी पडावे लागले होते. यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष सावरत शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर फडणवीस यांनीही राजीनामा दिल्याने शिवसेनेसमोरील मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग मोकळा झाला होता. भाजपासोबत शिवसेनेचे संबंध गेल्या सहा वर्षांत ताणले गेले होते. याचा परिणाम झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर प्रकर्षाने जाणवला. यामुळे अजित पवारांनी सत्तास्थापनेवेळी केलेले बंड शिवसेनेचे नेते कितपत मनाला लावून घेतात यावर सारे काही अवलंबून राहणार आहे.
महा विकास आघाडीच्या सरकारच्या चर्चेवेळी सत्तेची केंद्रे तिन्ही पक्षांना देण्यात येणार होती. यामध्ये मुख्यमंत्रीपद शिवसेनेला व दोन उपमुख्यमंत्रीपदे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला देण्यात येणार होती. यामध्ये राष्ट्रवादीकडून अजित पवारांचे नाव होते. मात्र, त्यांच्या बंडानंतरच्या चर्चेमध्ये उपमुख्यमंत्री पद राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांकडे द्यायचे ठरले आहे. तसेच पाटील विधिमंडळाचे राष्ट्रवादीचे गटनेतेही आहेत. यामुळे आता बंड शमल्याने पुन्हा राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये सहभागी झालेल्या अजित पवारांच्या पारड्यात कोणते मंत्रिपद पडते याकडे लक्ष लागले आहे.
यावर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना विचारले असता त्यांनी पाच वर्षे स्थिर सरकार राहणार आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहतील. आमचे सहकार्य त्यांना त्यांचे सहकार्य आम्हाला राहणार आहे. किमान समान कार्यक्रम काही रात्रीत ठरलेला नाही. दिवसाढवळ्या बनविण्यात आला आहे, असे सांगितले. तसेच अजित पवारांना मंत्रिमंडळात घेणार का या प्रश्नार त्यांनी मंत्रिमंडळामध्ये कोणाला घ्यायचे याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. उद्धव ठाकरे यांचा निर्णय आम्हाला मान्य असेल, असे म्हटले.