"सिंचन घोटाळा झाल्याचं पंतप्रधान मोदींनीच कबूल केलं"; पृथ्वीराज चव्हाणांनी अजित पवारांना पुन्हा डिवचलं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 08:41 AM2024-10-07T08:41:17+5:302024-10-07T08:45:34+5:30
Prithviraj Chavan : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली.
Prithviraj Chavan ( Marathi News ) : राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा काहीच दिवसात होणार असून महाविकास आघाडी आणि महायुतीने तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एका कार्यक्रमात बोलताना सिंचन घोटाळ्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सिंचन घोटाळा झाल्याचे कबूल केलं आहे, असं म्हणाले.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल एका कार्यक्रमात विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्यावरुन टीका केली.
छत्रपतींचे स्मारक कधी होणार? संभाजीराजेंचे टार्गेट भाजप; अरबी समुद्रात शिवस्मारक शोध आंदोलन
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मी त्यावेळी एवढंच विचारले की हे चाललंय काय? एवढा गलथान कारभार आहे का? तुमचं एवढं प्लॅनिंग चुकतंय का? ५०० कोटीत पाच वर्षात पूर्ण होणारं धरण ४० वर्षात अजूनही पूर्ण झालं नाही. एवढ्या वर्षात काय झालं? यासाठी मी याची श्वेतपत्रिका द्या म्हणून सांगितलं. मी हे फक्त पाठबंधारेला सांगितलं. दुर्दैवाने महाराष्ट्रात श्वेतपत्रिकेचा अर्थ चौकशी असा होतो पण तसा नाही, असा टोलाही पृथ्वीराज चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला.
"आर्थिक पाहणी अहवाल जो सादर केला. त्या अहवालात अशी माहिती होती की गेल्या दहा वर्षात ७० हजार कोटी रुपये खर्च झाले आणि सिंचन हे १८ वरुन १८.१ झाले आहे. म्हणजे सिंचन ०.१ एवढे वाढले. यानंतर अजित पवार यांनी तडका फडकी राजीनामा दिला. त्यावेळी अजित पवार म्हणाले माझ्या विरोधात काहीतरी केलं, ते कोणाच्या विरोधात नव्हतं, तो महाराष्ट्रासाठी हिताचा निर्णय होता. आता आपल्याला राजकीय बोलायचं असेल तर यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्कामोर्तब केला, त्यामुळे मला बोलायच काही कारण नाही, अशी टीका माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी उमपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली.
काही दिवसातच निवडणुकीची घोषणा होणार
काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाचे पथक दोन दिवस मुंबई दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी राज्यातील निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. आयोगाने तीन वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच ठिकाणी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याची सूचना राज्य सरकारला केली होती. त्याची पूर्तता झाल्याचे प्रमाणपत्र राज्याचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांना निवडणूक आयोगाला सादर करावे लागते. मात्र, या बदल्याच न झाल्याने आणि आयोगाच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याची गंभीर दखल निवडणूक आयोगाने घेतली. काही अधिकारी आपल्या गृहजिल्ह्यात तैनात आहेत. निवडणूक काळात अशा अधिकाऱ्यांची बदली ते रहिवासी असलेल्या जिल्ह्याच्या बाहेर करायची असते, त्याबाबतही आयोगाने केलेल्या सूचनांकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केल्याचे सांगत, या सर्व बदल्या करण्याचे निर्देश दिले आहेत, असे देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले आहे.