'तुमचा पक्ष चालवा ना, दुसऱ्यामध्ये कशाला तोंड घालता'; शरद पवारांचे मोजक्या शब्दात अजितदादांना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 01:23 PM2024-05-09T13:23:37+5:302024-05-09T13:23:54+5:30
Sharad Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या टीकेला शरद पवार यांनी मोजक्या शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे.
Sharad Pawar On Ajit Pawar : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे उघडपणे काका शरद पवारांवर निशाणा साधताना दिसत आहे. बारातमतीच्या निवडणुकीतही पवार कुटुंबिय समोरासमोर आलं होतं. या निवडणुकीत अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर गुरुवारी पुन्हा एकदा अजित पवारांनी शरद पवारांना लक्ष्य केलं.शरद पवारांच्या मनात असतात तेच निर्णय घेतात, असं विधान अजित पवार यांनी केलं आहे. त्यावर आता शरद पवारांनी मोजक्या शब्दात अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं.
निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ येतील किंवा काही काँग्रेसमध्ये विलीनही होतील, असं शरद पवार यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलं. त्यानंतर शरद पवार यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्याविषयी विचारले असता अजित पवार यांनी शरद पवारांच्या मनात असते, तोच निर्णय ते घेत असतात, ते कुणाचं ऐकत नाही. त्यांना हवं तसं ते करतात असं विधान अजित पवारांनी केलं आहे.पक्षाच्या विलीनीकरणाबाबत पवारांनी सामुहिकरित्या निर्णय होईल असं शरद पवारांनी म्हटलं होते. त्यावर अजित पवार पुण्यात बोलत होते.
शरद पवारांना जेव्हा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा ते स्वतः निर्णय घेतात आणि मग इतर सहकाऱ्यांना सांगतात.त्यानंतर शरद पवार असं दाखवतात की आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला, असं विधान अजित पवार यांनी केलं होतं. त्यावर बोलताना शरद पवार यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्ही तुमचा पक्ष चालवा ना, दुसऱ्याचा याच्यात कशाला तोंड घालता, असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
"मी फार जवळून शरद पवारांसोबत काम केले आहे. त्यांच्या कामाची पद्धत मला माहिती आहे. संभ्रमावस्था निर्माण करण्यासाठी शरद पवार अनेकदा विधाने करतात. उद्धव ठाकरे त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील वाटत नाही. मी त्यांचे काम पाहिले आहे. त्यांचा स्वभाव पाहिला आहे ते बघता ते पक्ष विलीन करण्याचा निर्णय घेतील असं वाटत नाही. शरद पवारांना ज्यावेळी निर्णय घ्यायचा असतो तेव्हा ते बाकीच्या सहकाऱ्यांना सांगतात, तो सामुहिक निर्णय आहे असं दाखवतात," असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.