Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 07:47 AM2024-11-26T07:47:57+5:302024-11-26T07:48:59+5:30
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: शिंदेसेनेला १२.३८, अजित पवार गटाला ९ टक्के मते, महायुतीत तीन पक्षांना मिळून ४८.१६ टक्के मते, मविआच्या तीन पक्षांना मिळून ३३.६५ टक्के मते, भाजप उमेदवारांना सरासरी ५१.७८ टक्के मते
यदु जोशी
मुंबई - विधानसभा निवडणुकीत एकूण मतदानाच्या २६.७७ टक्के मते घेऊन भाजप क्रमांक एकवर आहे. शिंदेसेनेला १२.३८ तर अजित पवार गटाला ९.०१ टक्के मते मिळाली, याचा अर्थ महायुतीला एकूण ४८.१६ टक्के मते मिळाली. महाविकास आघाडीत काँग्रेसला १२.४१, उद्धवसेनेला ९.९६ टक्के, तर शरद पवार गटाला ११.२८ म्हणजे ३३.६५ टक्के मते मिळाली. या निवडणुकीत ६ कोटी ४५ लाख ९२ हजार ५०८ इतके मतदान झाले. त्यात भाजपला १ कोटी ७२ लाख ९३ हजार ६५० मते मिळाली. शिंदेसेनेला ७९ लाख ९६ हजार ९३० मते, अजित पवार गटाला ५८ लाख १६ हजार ५६६ मते आहेत. मतांची टक्केवारी या मिळालेल्या मतांशी तुलना करून काढली आहे.
महायुतीची कशी राहिली कामगिरी?
भाजप - भाजपने ज्या १४९ जागा लढविल्या तिथे झालेल्या आणि त्यातून भाजपला मिळालेल्या मतांची टक्केवारी काढली असता पक्षाच्या उमेदवारांना सरासरी ५१.७८ टक्के मते मिळाली. १३२ उमेदवार निवडून आले. आपल्या उमेदवारांना ५० टक्क्यांहून अधिक मते मिळाली पाहिजेत हे उद्दिष्ट भाजपने साध्य केले. भाजपने ज्या जागा लढविल्या तिथे मतदान झाले ३ कोटी ३३ लाख ९५ हजार ६२१. भाजपच्या उमेदवारांना त्यातील १ कोटी ७२ लाख ९३ हजार ६५० मते मिळाली. याचा अर्थ त्यांना झालेल्या मतदानाच्या ५१.७८ टक्के मते मिळाली. ज्या बूथवर परंपरेने आपल्याला मोठे मतदान होते तेथे १० टक्के मतदान वाढवायचे अशी रणनीती भाजपच्या यंत्रणेने राबविली.
शिंदेसेना - शिंदेसेनेने ८१ उमेदवार उभे केले, त्यातील ५७ जिंकले. या मतदारसंघांमध्ये मतदान झाले, १ कोटी ७५ लाख ९ हजार ५३४. शिंदेसेना उमेदवारांना त्यातील ७९ लाख ९६ हजार ९३० मते प्राप्त झाली. म्हणजे या ८१ जागांवर झालेल्या मतदानात त्यांना ४५.६७ टक्के मतदारांनी पसंती दिली.
अजित पवार गट - अजित पवार गटाने ५९ जागा लढविल्या आणि जिंकल्या ४१. या ५९ जागांवर मतदारांची संख्या होती, १ कोटी ३७ लाख ९१ हजार ३५२.
या गटाच्या उमेदवारांना त्यातील ५८ लाख १६ हजार ५६६ मते मिळाली. याचा अर्थ त्यांना ४२.१८ टक्के मतदारांनी पसंती दिली.
छोट्या मित्रपक्षांना किती मते?
महायुतीतील लहान मित्रपक्षांनी पाच जागा लढविल्या. तेथे १२ लाख ९० हजार २२ इतके मतदान झाले आणि मित्रपक्षांना ६ लाख ७४ हजार २२९ मते मिळाली. त्यांना मिळून महायुतीला ३ कोटी १७ लाख ८१ हजार ३७५ मते मिळाली. या जागा मिळविल्या तर राज्यातील एकूण मतदानाच्या ४९.२० टक्के मते ही महायुतीला मिळाली.
आमनेसामने होते तिथे किती मते?
महायुतीतील दोन पक्ष काही मतदारसंघांमध्ये आमनेसामने होते. हे लक्षात घेता महायुतीचे एकूण २९४ उमेदवार होते. त्यांना एकत्रितपणे ३ कोटी १७ लाख ८१ हजार ७७५ मते मिळाली. ही टक्केवारी एकूण मतदानाच्या ४९.२० टक्के इतकी आहे. मात्र, भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार गट मिळून ४८.१६ टक्के मते मिळाली.
मविआची कामगिरी कशी?
काँग्रेस - १०१ जागा लढविल्या आणि तिथे मतदान झाले, २ कोटी २४ लाख ६९ हजार ४५. त्यापैकी काँग्रेसला मिळाली ८० लाख २० हजार ९२१ मते. झालेल्या एकूण मतदानाशी तुलना केली तर काँग्रेसला ३५.७० टक्के मते मिळाली. १६ जागा जिंकता आल्या.
उद्धवसेना - उद्धवसेनेने लढविलेल्या ९५ मतदारसंघांमध्ये मतदान झाले, २ कोटी २ लाख ७९ हजार ४२६. त्यापैकी उद्धवसेनेच्या उमेदवारांना मते मिळाली, ६४ लाख ३३ हजार १३. झालेल्या मतदानाशी तुलना करता त्यांना ३१.७२ टक्के मते मिळाली. २० आमदार निवडून गेले.
शरद पवार गट - ८६ जागा लढविल्या आणि त्यांचे १० जण जिंकले. त्यांच्या या ८६ मतदारसंघांमध्ये मतदान झाले, २ कोटी ५ लाख ५२ हजार १४९. त्यांना मते मिळाली ७२ लाख ८७ हजार ७९७. झालेल्या मतदानाशी तुलना करता त्यांना ३५.४६ टक्के मते मिळाली.
तीन पक्षांना मिळून किती मते?
तीन पक्षांना मिळून ६ कोटी ४५ लाख ९२ हजार ५०८ मतांपैकी २ कोटी १७ लाख ४१ हजार ७३१ मते मिळाली. ही सरासरी ३३.६५ टक्के इतकी आहे, तीन पक्षांना मिळून ४६ जागा मिळाल्या.
मित्रपक्षांना किती मते?
मविआने समाजवादी पार्टीसाठी दोन (शिवाजीनगर मानखुर्द, भिवंडी पूर्व), शेकापसाठी अलिबाग, माकपसाठी कळवण, डहाणू, भाकपसाठी शिरपूरची जागा सोडली होती. या पक्षांच्या उमेदवारांना ४ लाख ८४ हजार मते मिळाली. ही मते मिळविली तर मविआ उमेदवारांना २ कोटी २२ लाख २५ हजार ७३१ मते मिळाली. ही टक्केवारी राज्यातील एकूण मतदानाच्या ३४ टक्के आहे. फक्त काँग्रेस, उद्धवसेना आणि शरद पवार गट मिळून ३३.६५ टक्के मते मिळाली आहेत.