Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: विदर्भाने कमळ फुलवले, काॅंग्रेसची लाज राखली; अजितदादांनीही दाखवला करिष्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 07:31 AM2024-11-24T07:31:10+5:302024-11-24T07:31:25+5:30

ठाकरे गटाचे उमेदवार सिद्धार्थ खरात यांनी मेहकर मतदार संघात शिंदेसेनेच्या डाॅ. संजय रायमूलकर यांना पराभूत केले.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: BJP wins in Vidarbha, Congress also wins 9 seats, rejects Sharad Pawar leadership and accepts Ajit Pawar | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: विदर्भाने कमळ फुलवले, काॅंग्रेसची लाज राखली; अजितदादांनीही दाखवला करिष्मा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: विदर्भाने कमळ फुलवले, काॅंग्रेसची लाज राखली; अजितदादांनीही दाखवला करिष्मा

राजेश शेगाेकार
 
नागपूर : विदर्भातील निकाल हा राज्यातील सत्तेचा समृद्धी मार्ग आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. अकरा जिल्ह्यांतील मतदारांनी तब्बल ३८ जागांवर कमळ फुलविलेच, पण राज्यात १५ जागा जिंकणाऱ्या काॅंग्रेसला विदर्भातून ९ जागांचे दान देत काॅंग्रेसचीही लाज राखली आहे. वंचित बहुजन आघाडी व प्रहार या पक्षांना कर्मभूमीत राेखत मतविभाजनाचा मुद्दाच निकालात काढला. 

दलित-मुस्लिम-कुणबी म्हणजे डीएमके या फाॅर्म्युल्याने गेल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला बऱ्यापैकी यश दिले हाेते. भाजपाने या घटकांची नाराजी येणार नाही याची कमालीची दक्षता घेतली.  नागपूरसह विदर्भातील विकासाचे चित्र उभे केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  केंद्रीय नेते नितीन गडकरी यांचे नेतृत्व व  प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पायाला भिंगरी लावल्यागत  पिंजून काढलेल्या विदर्भात माेदी, शाहांच्या सभेने ऊर्जा भरल्याने कमळ फुलले.

काँग्रेससह महाविकास आघाडीत जागावाटपातील वाद, बंडखोरी व समन्वयाचा अभाव, अपवाद वगळता तळाच्या कार्यकर्त्यांची फळी व बूथ यंत्रणा विस्कळीत हाेती. राहुल गांधी यांच्या दाेन सभा व प्रियांकांच्या राेड शाेमुळे  पूर्व विदर्भात काॅंग्रेसने सहा जागा जिंकल्या मात्र पश्चिम विदर्भात वंचित विरुद्ध महायुती अशा तिरंगी लढतीचा फटका काॅंग्रेसला बसला. गाेंदिया, अमरावती, वर्धा व बुलढाणा जिल्हा काॅंग्रेसमुक्त झाला. प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनाही निसटता विजय मिळाला. अनेक  दिग्गज पराभूत झाले.

अजित पवारच ‘दादा’ :  विदर्भात शरद पवारांचे नेतृत्व मतदारांनी नाकारले. शरद पवार गटाने  १३ जागा लढविल्या मात्र यश मिळाले नाही. या उलट अजित पवारांनी सात जागा लढवून सहा जागांवर यश मिळविले. विशेष म्हणजे केवळ अमरावती वगळता अजित पवार पूर्व विदर्भात प्रचाराला फिरक नाहीत.
पूर्वेत शिंदे, पश्चिममध्ये उद्धवसेना : दाेन्ही सेनेने प्रत्येकी ९ जागा लढवून प्रत्येकी ४ जागा जिंकल्या. शिंदेसेनेनेे पूर्वेत रामटेक, भंडारा, पश्चिम विदर्भात बुलढाणा, दिग्रस या दाेन्ही विभागांत आवाज कायम ठेवला.

पश्चिम विदर्भात वंचित व प्रहारची ताकद माेठी आहे मात्र या दाेन्ही पक्षांना भाेपळाही फाेडता आलेला नाही. खुद्द बच्चू कडू यांचा पराभव झाला असून ॲड. प्रकाश आंबेडकर यांना सलग दुसऱ्या निवडणुकीत एकही आमदार निवडून आणता आलेला नाही.

सिंदखेडराजात अजित पवार गटाचे मनाेज कायंदे हे जायंट किलर ठरले. त्यांनी शरद पवार गटाचे डाॅ. राजेंद्र शिंगणे व शिंदेसेनेचे शशिकांत खेडेकर यांचा पराभव केला. ठाकरे गटाचे उमेदवार सिद्धार्थ खरात यांनी मेहकर मतदार संघात शिंदेसेनेच्या डाॅ. संजय रायमूलकर यांना पराभूत केले. देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी राहिलेले सुमित वानखडे यांचा वर्धेतील विजयही लक्षवेधी ठरला. 

पाच मुद्द्यांत विश्लेषण

भाजपचे मॅनेजमेंट  : बूथ लेव्हलपासून सूक्ष्म नियाेजन, मित्र पक्षांना ताकदीनुसार जागांचे वाटप, तसेच युतीधर्माचे पालन.संघाची समर्थ साथ.
ॲन्टी इन्कम्बन्सी टाळली  : भाजपने सात मतदारसंघांत आमदारांचे तिकीट कापले व यश मिळविले. बंडखाेरी टाळली, नाराजी संपविली.
आघाडीकडे नवा मुद्दा नव्हता : लाेकसभा निवडणुकीत संविधान धाेक्यात हे नॅरेटिव्ह यशस्वी ठरले. यावेळी आकर्षक मुद्दा नव्हता. 
समन्वयाचा अभाव : आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव, जागावाटपावरून ताणलेले संबध, निर्माण झालेली कटुता अडचणीची ठरली
याेजनांचे गारूड :  लाडकी बहीणसह विविध याेजनांचे मतदारांवरील गारूड महत्त्वाचे ठरले.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: BJP wins in Vidarbha, Congress also wins 9 seats, rejects Sharad Pawar leadership and accepts Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.