नेते पकडले पण शेगावच्या सभेतच राहुल गांधींना एकट्या मनसैनिकाने काळे झेंडे दाखवले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 10:36 PM2022-11-18T22:36:47+5:302022-11-18T22:37:07+5:30

राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शेगावच्या सभेत काळे झेंडे दाखवा असा आदेश मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिला होता

MNS worker protested Rahul Gandhi in Shegaon meeting | नेते पकडले पण शेगावच्या सभेतच राहुल गांधींना एकट्या मनसैनिकाने काळे झेंडे दाखवले

नेते पकडले पण शेगावच्या सभेतच राहुल गांधींना एकट्या मनसैनिकाने काळे झेंडे दाखवले

googlenewsNext

शेगाव - काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे राज्यात वादाला तोंड फुटले. भारत जोडो यात्रेत राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या विधानामुळे राज्यातील राजकीय वातावरण पेटले. राहुल गांधींच्या विधानाचा निषेध करण्यासाठी भाजपा-मनसे-शिंदे गटाने आक्रमक पवित्रा घेतला. राज्यात ठिकठिकाणी राहुल गांधींविरोधात आंदोलन करण्यात आले. त्यात मनसेने शेगावच्या सभेत काळे झेंडे दाखवत राहुल गांधींचा निषेध केला. 

राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शेगावच्या सभेत काळे झेंडे दाखवा असा आदेश मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिला होता. त्यानंतर राज्यातून मनसैनिक शेगावच्या दिशेने रवाना झाले. यात प्रामुख्याने मनसे नेते नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, अविनाश जाधव, प्रकाश महाजन, दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्त्वात मनसे कार्यकर्त्यांनी कुठे काळे झेंडे दाखवत तर कुठे राहुल गांधींचे पोस्टर फाडून निषेध नोंदवला. आज सकाळी राहुल गांधींची भारत जोडो यात्रा बुलढाण्यातून शेगावमध्ये पोहचली. त्याठिकाणी गजानन महाराज मंदिर परिसरात मनसे रायगड जिल्हाप्रमुख जितेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले. 

त्यानंतर शेगावच्या सभेत राहुल गांधी जनसमुदायाला संबोधित करताना त्याठिकाणी काही मनसैनिकांनी काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वेळीच प्रसंगावधान राखत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. राहुल गांधींचे भाषण सुरू असताना सभेत हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. मनसैनिकांनी घातलेल्या गोंधळामुळे काँग्रेस कार्यकर्तेही जागेवरून उठले. मात्र पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना गर्दीतून बाजूला काढत बाहेर आणले. 

राहुल गांधी यांनी सावरकरांवर बोलणे टाळले 
 गेल्या काही दिवसांपासून सावरकरांवरून वाद पेटलेला असताना शेगाव येथील सभेत खासदार राहुल गांधी यांनी सावरकरांवर बोलणं टाळलं. मात्र भाजपावर जोरदार टीका केली. राहुल गांधी म्हणाले की, द्वेष व हिंसेने देशाचा फायदा होत नाही. महाराष्ट्र भूमी ही साधु, संत, महापुरुषांची भूमी आहे. यांनी लोकांना प्रेम दिले, लोकांना जोडण्याचे काम केले आम्हीही तेच करत आहोत. आम्ही देश जोडण्याचे काम करत आहोत. ज्या लोकांनी त्यांच्या आयुष्यात हिंसा अनुभवली आहे ते द्वेष पसवत नाहीत. शेतकरी, कामगार यांच्या मनात द्वेष असूच शकत नाही. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमी. शिवाजी महाराज व आपण यांच्यात खूप फरक आहे, ते महान होते, ते महाराष्ट्राचा आवाज होते. शिवाजी महाराज यांना त्यांच्या आई जिजाऊ यांनी मार्ग दाखवला त्या मार्गाने ते गेले म्हणून ते छत्रपती बनले असं राहुल गांधी म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: MNS worker protested Rahul Gandhi in Shegaon meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.