मोदी-शाह यांनी शिंदे-फडणवीस आणि अजित पवारांनाही गुजरातला घेऊन जावे, काँग्रेसची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 05:34 PM2024-01-03T17:34:12+5:302024-01-03T17:35:18+5:30

Congress Criticize Maharashtra Government : वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअर बस, मुंबईतील हिरे व्यापारानंतर आता राज्याच्या सहकार क्षेत्रावरही हल्ला केला जात असून, सहकार क्षेत्रातील एक महत्वाचा व नावाजलेला दुग्ध प्रकल्प ‘महानंद’ डेअरी गुजरातच्या दावणीला बांधला जात आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. 

Modi-Shah should take Eknath Shinde- Devendra Fadnavis and Ajit Pawar to Gujarat too, Congress criticizes | मोदी-शाह यांनी शिंदे-फडणवीस आणि अजित पवारांनाही गुजरातला घेऊन जावे, काँग्रेसची बोचरी टीका

मोदी-शाह यांनी शिंदे-फडणवीस आणि अजित पवारांनाही गुजरातला घेऊन जावे, काँग्रेसची बोचरी टीका

मुंबई - केंद्र सरकारच्या मदतीने सत्तेवर आलेल्या असंवैधानिक शिंदे फडणवीस अजित पवार सरकारच्या काळात दररोज महाराष्ट्राला लुटले जात आहे. वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअर बस, मुंबईतील हिरे व्यापारानंतर आता राज्याच्या सहकार क्षेत्रावरही हल्ला केला जात असून, सहकार क्षेत्रातील एक महत्वाचा व नावाजलेला दुग्ध प्रकल्प ‘महानंद’ डेअरी गुजरातच्या दावणीला बांधला जात आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. शिंदे सरकार आता गुजरातला महानंद गेलाच नाही किंवा मोदीजी यापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देणार आहेत अशी तकलादू उत्तरे देऊन दिशाभूल करतील. मोदी-शहांनी आता एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनाच गुजरातला घेऊन जावे, असा टोलाही अतुल लोंढे यांनी लगावला आहे.

 भाजपा सरकारचा समाचार घेताना अतुल लोंढे म्हणाले की, मुंबई, महाराष्ट्र लुटण्यासाठीच तोडफोडीचे राजकारण करुन भाजपाने सत्ता बळकावली आहे. महाविकास आघाडी सरकार गुजरात लॉबीच्या कुटील हेतूंच्या आड येत होते. गुजरात लॉबीसमोर होयबा करत नव्हते म्हणूनच सरकार पाडले व मागील दीड वर्षात महाराष्ट्राची अक्षरशः लुट सुरू आहे. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना नाही म्हणण्याची हिम्मतच नाही. राजरोसपणे महाराष्ट्रावर दरोडा टाकून लुटले जात असताना हे तिघेजण फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत. शिंदे, फडणवीस व अजित पवार हे मोदी शहांसमोर फक्त ‘सह्याजीराव’ आहेत, दिल्लीने दिलेल्या आदेशानुसार फाईलवर सही करणे एवढेच त्यांचे काम आहे.

महाराष्ट्रात सहकार क्षेत्राने समृद्धी आणली, ग्रामीण भागात या सहकारने आर्थिक प्रगती केली पण याच सहकारावर आता मोदी-शहांची वक्रदृष्टी पडली आहे. महानंदचा कारभार राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाकडे देण्याचा ठराव झाला आहे. दुग्ध व्यवसायात महाराष्ट्रातील महानंद, गोकूळ, वारणा, चितळे या सारख्या असंख्य संस्थांचे मोठे जाळे आहे. ग्रामीण भागात दूग्ध व्यवसाय हा शेतीला पूरक व्यवसाय आहे व सहकारच्या माध्यमातून मोठी क्रांती झालेली आहे पण गुजरातच्या ‘अमूल’साठी महानंदचा बळी दिला जात आहे. राज्यातील महत्वाचे प्रकल्प गुजरातला पळवून नेले जात आहेत. शिंदे सरकार आता गुजरातला महानंद गेलाच नाही किंवा मोदीजी यापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देणार आहेत अशी तकलादू उत्तरे देऊन दिशाभूल करतील. मोदी-शहांनी आता एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनाच गुजरातला घेऊन जावे, असा टोलाही अतुल लोंढे यांनी लगावला आहे.

Web Title: Modi-Shah should take Eknath Shinde- Devendra Fadnavis and Ajit Pawar to Gujarat too, Congress criticizes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.