'आशीर्वादाचं वैभव सदैव गाठीशी...'; आक्रोश यात्रेमधील खास क्षण; कोल्हेंनी शेअर केला Video
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 06:14 PM2023-12-28T18:14:17+5:302023-12-28T18:21:56+5:30
अमोल कोल्हे यांनी आज शेतकरी आक्रोश यात्रेमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे.
शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या 'शेतकरी आक्रोश मोर्चा'ला काल शिवनेरी किल्ल्यावरून सुरुवात झाली. केंद्र, राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना प्रत्येक गोष्टीत दाबून टाकण्याचे काम केले जात आहे. शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढावा लागतो, ही दुर्दैवाची बाब आहे असे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले. शिवनेरीवरुन २७ डिसेंबर रोजी निघालेला हा मोर्चा ३० डिसेंबर रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. आज या मोर्चाचा दुसरा दिवस आहे.
शेतकऱ्यांच्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. अजितदादांचा एवढा दरारा आहे. त्यांनी केंद्र सरकारला बोलून कांदा निर्याद बंदी उठवावी. त्यांच्याकडे अर्थखाते असल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दरवाढ द्यावी. शेतकऱ्यांना रात्री वीज पुरवठा होत असल्याने पीकांना पाणी देण्यासाठी समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज द्यावी, अश्या मागण्या अमोल कोल्हे यांनी केल्या. या आक्रोश यात्रेदरम्यान अमोल कोल्हे यांना विविध लोक भेटत आहे.
अमोल कोल्हे यांनी आज 'एक्स' (ट्विटर)वर आक्रोश यात्रेमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओद्वारे शेतकरी आक्रोश मोर्चाचा प्रवास हा असंख्य अनुभवांनी भारावून टाकणारा आहे. माता भगिनींचे असंख्य आशीर्वाद, त्यांच्या हाताने भारावलेला मायेचा घास आणि खूप साऱ्या शुभेच्छा हे सारं शब्दांच्या पलीकडचं आहे, असं अमोल कोल्हे म्हणाले. तसेच आयुष्यात चढ उतार असंख्य येतील पण या आशीर्वादांचं वैभव सदैव गाठीशी असेल, असं अमोल कोल्हे यांनी सांगितले.
शब्दांच्या पलीकडले..!
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) December 28, 2023
शेतकरी आक्रोश मोर्चाचा प्रवास हा असंख्य अनुभवांनी भारावून टाकणारा आहे.
माता भगिनींचे असंख्य आशीर्वाद, त्यांच्या हाताने भारावलेला मायेचा घास आणि खूप साऱ्या शुभेच्छा हे सारं शब्दांच्या पलीकडचं आहे !
आयुष्यात चढ उतार असंख्य येतील पण या आशीर्वादांचं वैभव सदैव… pic.twitter.com/j101k4Ydnb
अजित दादांनी दिलंय कोल्हेंना चॅलेंज
५ वर्षात एका खासदाराने त्याच्या मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं. त्यांनी मतदारसंघ दुर्लक्षित केलं होतं. त्यांना निवडून आणण्यासाठी मी स्वतः जीवाचे रान केलं होतं. मी बोलणार नव्हतो. पण यांना आता उत्साह आला आहे. कोणाला पद यात्रा सुचते कोणाला संघर्ष यात्रा काढायची आहे. आम्हाला वाटले होते ते वक्ते उत्तम आहे. संभाजी महाराज यांच्याबद्दल उत्तम भूमिका त्यांनी बजावली होती. शिरूरमध्ये पर्याय देणार, तुम्ही काळजीच करू नका तिथे असलेला उमेदवार निवडूनच आणणार असल्याचा विश्वास अजित पवार यांनी यावेळी दाखवला आहे.