नाना पटोलेंची सोनियांकडे राष्ट्रवादीची तक्रार, अजित पवार म्हणाले...ही तर परंपराच!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 12:51 PM2022-05-16T12:51:06+5:302022-05-16T12:51:47+5:30
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना विचारण्यात आलं असता त्यांनी सावध पवित्रा घेत कुटुंबात भांड्याला भांडं लागतच असतं.
कराड-
अडीच वर्षांपूर्वी ज्या मुद्द्यांवर सरकार बनलं होतं त्याचं उल्लंघन करत राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपाला मदत करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट सोनिया गांधी यांच्याकडे याबाबतची तक्रार केलेली असल्याची माहिती दिली. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना विचारण्यात आलं असता त्यांनी सावध पवित्रा घेत कुटुंबात भांड्याला भांडं लागतच असतं. तक्रार करण्याची आपली परंपराच आहे, असं म्हटलं आहे. ते कराडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
"नाना पटोलेंनी त्यांच्या नेत्यांना काय सांगावं हा त्यांच्या अधिकार आहे. तक्रार करण्याची परंपराच आहे. आम्हीही आमच्या पक्ष श्रेष्ठींकडे तक्रार करत असतो. शेवटी एका कुटुंबात भांड्याला भांडं लागतं असं आपण म्हणतो. इथं तर तीन कुटुंब आहेत. मग भांड्याला भांड लागणारच. पण सरकार नीट चालावं याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू शकतो आणि तेच आम्हा सर्वांचं उद्दीष्ट आहे", असं अजित पवार म्हणाले.
"प्रत्येक पक्षाची ध्येय आणि विचार वेगवेगळे असतात. त्यांनी काय करावं आणि काय नाही याचा निर्णय घेणं हा त्यांचा अधिकार आहे. देशात २४ पक्षांच्या एनडीएचं सरकार आपण पाहिलं आहे. यात हवेदावे आणि वाद होतच असतात. कुटुंब म्हटलं की भांड्याला भांडं लागतंच", असं अजित पवार म्हणाले.
महाराष्ट्राची परंपरा आरोप-प्रत्यारोपांची नाही
"सगळ्याच राजकीय पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना माझं एकच सांगणं आहे. देशासाठी आणि राज्यासाठी जे महत्वाचे विषय आहेत त्यालाच प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. महाराष्ट्राची परंपरा आरोप-प्रत्यारोपांची नाही. प्रत्येकानं सांमजस्याची भूमिका घेऊन लोकांसाठी काम केलं पाहिजे. मला विकासाबद्दल, पावसाळ्याबद्दल, शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल आणि चालू समस्यांबद्दल विचारा. कुणी काय आरोप-प्रत्यारोप केले ते मला विचारू नका", असं अजित पवार म्हणाले.