बाळासाहेब थोरातांना मी आधीच सांगितले होते, पण...; अजित पवारांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 10:16 AM2023-01-14T10:16:02+5:302023-01-14T10:16:49+5:30
नाशिक पदवीधर निवडणुकीवरून आता महाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
मुंबई - विधान परिषदेच्या ५ जागांसाठी येत्या ३० जानेवारीला मतदान होणार आहे. परंतु या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीतला गोंधळ चव्हाट्यावर आला आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीत ऐनवेळी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुधीर तांबे यांनी माघार घेत स्वत:च्या मुलाला अपक्ष उमेदवार म्हणून उभं केले. त्यामुळे निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवारच नाही. त्यात आता या राजकीय घडामोडीनंतर मविआत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काहीतरी शिजतंय असं मी बाळासाहेब थोरातांना आधीच सांगितले होते असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे.
अजित पवार म्हणाले की, असं काहीतरी कानावर येतेय, तुम्ही काळजी घ्या, काही वेगळं शिजतंय अशी बातमी आहे. हे मी बाळासाहेब थोरात यांना पूर्णपणे आदल्यादिवशी सांगितले होते. पण ते म्हणाले तुम्ही काळजी करू नका, आमच्या पक्षाची जबाबदारी आम्ही व्यवस्थित पार पाडू, उद्या डॉ. तांबेंचाच अर्ज भरणार आहेत असं बाळासाहेबांनी मला म्हटल्याचं चांगलं मला आठवतंय असं त्यांनी सांगितले. त्यामुळे सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवरून बाळासाहेब थोरातांनी अजित पवारांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले का? असा प्रश्न आता निर्माण होत आहे.
पंकजा मुंडे यांच्या ठाकरे गटातील प्रवेशावर अजितदादांचं भाष्य
कोण कुठे जाणार हे सांगायला मी ज्योतिषी नाही. मला हे बघायचंही कारण नाही. मी माझ्या पक्षाचं काम करणारा कार्यकर्ता आहे. कुणी कुठल्या पक्षात जावं हा वैयक्तिक अधिकार आहे. कुठल्याही पक्षाचं काम करताना विश्वासार्ह महत्त्वाचा आहे. विश्वास गमावू नये याची काळजी घेतली पाहिजे अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.
शिवसेनाही नाराज
नाशिकमध्ये जे घडले त्याचे श्रेय भाजप घेत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या चाणक्यगिरीमुळे नाशिकमध्ये हे घडले असे सांगितले जाते. हाती सत्ता व केंद्रीय तपास यंत्रणा असली की, असे चाणक्य पायलीस पन्नास निर्माण होतात. यात राजकीय खेळी कमी व सत्तेचा गैरवापर जास्त आहे. महाविकास आघाडीतील ढिलाई भाजपच्या पथ्यावर पडली, असेच म्हणावे लागेल. पाच जागी निवडणुका होत आहेत. त्याबाबत एकत्र बसून काही साधकबाधक चर्चा झाली काय? काही नियोजन, बांधणी ठरली काय? तर त्याचे उत्तर ‘नाही’ असेच द्यावे लागेल असं सांगत शिवसेनेने काँग्रेसबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.