Devendra Fadnavis: राहुल गांधींनी देशाची माफी मागावी; देवेंद्र फडणवीस कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 03:51 PM2022-06-13T15:51:47+5:302022-06-13T15:52:47+5:30

५ हजार स्वातंत्र्यसैनिकांनी तयार केलेल्या एजीएलमध्ये २ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचं समोर आले होते. त्यामुळे राहुल गांधींना चौकशीसाठी बोलावले असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

National Herald case ED: Congress Rahul Gandhi should apologize to the country - BJP Devendra Fadnavis | Devendra Fadnavis: राहुल गांधींनी देशाची माफी मागावी; देवेंद्र फडणवीस कडाडले

Devendra Fadnavis: राहुल गांधींनी देशाची माफी मागावी; देवेंद्र फडणवीस कडाडले

googlenewsNext

मुंबई - मी राहुल गांधी(Rahul Gandhi) आहे, सावरकर नाही, माफी मागणार नाही असं पोस्टर दिल्लीत पाहायला मिळालं. ११ वर्ष स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काळ्यापाण्याची शिक्षा भोगली. अशा सावरकरांना अपमानित करून स्वातंत्र्यसेनानींची संपत्ती हडप केल्याप्रकरणी राहुल गांधी यांनी देशाची माफी मागायला हवी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 

देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या देशात कुणीही भ्रष्टाचार केला तरी त्यांच्याविरोधात कारवाई निश्चित होईल. आज कोर्टाच्या आदेशानुसार ईडीने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. परंतु चौकशीच्या निमित्ताने काँग्रेसनं देशातील प्रमुख शहरांत आंदोलनं करून लोकांना वेठीस धरण्याचं काम केले. भ्रष्टाचारासंदर्भात पुरावे मिळाल्यानंतर चौकशीला बोलावलं. व्हिक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे असा आरोप त्यांनी केला.  

तसेच ५ हजार स्वातंत्र्यसैनिकांनी तयार केलेल्या एजीएलमध्ये २ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचं समोर आले होते. एजीएल ही कंपनी १९३८ मध्ये तयार झाली होती. स्वातंत्र्यसंग्रामात स्वत:चं वृत्तपत्र असावं म्हणून स्वातंत्र्यसेनानींनी एजीएलची स्थापना केली होती. ही राष्ट्रीय संपत्ती असून खासगी संपत्ती नाही. २०१० मध्ये राहुल गांधी कुटुंबाने यंग इंडिया नावाची कंपनी स्थापन केली आणि एजीएलची संपत्ती यंग इंडियाला ट्रान्सफर केली. काँग्रेसनं चौकशीचा बाऊ करण्याऐवजी चौकशीला सामोरं जायला हवं होतं असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. 

काय आहे प्रकरण?
नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र १९३८ मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी सुरू केले होते. हे वृत्तपत्र असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (AJL) ने प्रकाशित केले होते. त्याची स्थापना १९३८ मध्ये झाली आणि इतर ५००० स्वातंत्र्य सैनिक त्याचे भागधारक होते. कंपनीने उर्दूमध्ये कौमी आवाज आणि हिंदीमध्ये नवजीवन ही इतर दोन दैनिकेही प्रकाशित केली. नॅशनल हेराल्डची ओळख भारताच्या स्वातंत्र्यामुळे झाली. वृत्तपत्राला देशातील महान राष्ट्रवादी वृत्तपत्र म्हणून प्रतिष्ठा मिळाली. जवाहरलाल नेहरू नियमितपणे वर्तमानपत्रात कठोर शब्दांत स्तंभ लिखान करायचे. 

१९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा नेहरुंनी पंतप्रधान म्हणून जबाबदारी स्विकारली आणि वृत्तपत्र मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पण वृत्तपत्राची विचारधारा घडवण्यात काँग्रेस पक्षाचा मोठा वाटा राहिला. नॅशनल हेराल्ड हे देशातील आघाडीचे इंग्रजी वृत्तपत्र बनले. काँग्रेस पक्षाकडून वृत्तपत्राला आर्थिक मदत सुरुच होती. पण २००८ मध्ये वृत्तपत्राने आर्थिक कारणास्तव कामकाज बंद केले. त्याचे डिजिटल प्रकाशन २०१६ मध्ये सुरू झाले. गांधी कुटुंबाविरुद्धचा खटला भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी २०१२ मध्ये ट्रायल कोर्टात आणला होता. स्वामींनी आरोप केला की, एजीएलचा पैसा गांधी कुटुंबाने काँग्रेस पक्षाचा निधी म्हणून वापरला आणि AJL ताब्यात घेऊन २० अब्ज रुपयांची संपत्ती मिळवली. २००८ मध्ये नॅशनल हेराल्ड बंद झाले तेव्हा काँग्रेस AJL चे मालक होते आणि यावर ९०० दशलक्ष रुपये कर्ज होते. 

देशभरात काँग्रेसची निदर्शने
नॅशनल हेराल्ड प्रकरणात एजन्सीसमोर हजर राहण्यासाठी राहुल गांधी यांच्यासह शेकडो पक्ष कार्यकर्त्यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. नागपुरात काँग्रेस कार्यकर्ते ईडी कार्यालयावर धडकल्याने वातावरण चांगलेच तापले. कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी मंत्री विजय वडेट्टीवार यांना ताब्यात घेतले असून आमदार अभिजित वंजारी गिरीश पांडव यांचाही समावेश असल्याची माहिती आहे. 

 

Web Title: National Herald case ED: Congress Rahul Gandhi should apologize to the country - BJP Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.