“सुप्रियाताई १५ वर्ष अजितदादांमुळे निवडून आल्या, आता ते सोबत नाहीत तर...”: रुपाली चाकणकर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 03:26 PM2024-01-01T15:26:03+5:302024-01-01T15:33:33+5:30
NCP Ajit Pawar Group News: लोकसभा, विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय होईल. अजितदादा मुख्यमंत्री व्हावे ही आमचीही इच्छा आहे, असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.
NCP Ajit Pawar Group News ( Marathi News ): गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरद पवार गटातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडताना दिसत आहेत. यातच आता अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी याबाबत भाष्य केले असून, सुप्रिया सुळे या गेल्या १५ वर्षांपासून अजित पवार यांच्यामुळे निवडून येत आहेत. आता अजितदादा सोबत नाही म्हटल्यावर मतदारसंघात तळ ठोकावा लागत आहे, या शब्दांत रुपाली चाकणकर यांनी टीका केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यातील वाद आता टोकाला जाताना दिसत आहे. एका खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि वळसे पाटलांनी प्रयत्न केला. नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली. यानंतर अमोल कोल्हे यांनीही पलटवार केला. दोघांमधील वादाबाबत दोन्ही गटातील नेत्यांनी प्रतिक्रिया देताना एकमेकांवर टीका केली. यात आता सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे अजितदादांमुळेच खासदार झाल्याचे वक्तव्य रुपाली चाकणकर यांनी केले आहे.
भावनिक राजकारण आता संपलेले आहे
जे खासदार दादांबद्दल बोलत आहेत, त्या दोन्ही खासदारांना दादांनीच निवडून आणले आहे. दादांमुळेच ते निवडून आले. त्यांच्या अफाट आणि विराट सभांमध्ये रिकाम्या खुर्च्यांशिवाय काही दिसले नाही. भावनिक राजकारण आता संपलेले आहे. महाराष्ट्राच्या जनतेला विकासाचे राजकारण हवे आहे. जे खासदार दादांवर बोलतात, त्यांनी आत्मपरीक्षण करावे. ताईंना १० महिने तळ ठोकावा लागला, असे सांगितले तर याचाच अर्थ असा की, दादा होते, तोपर्यंत फक्त मतदानाच्या दिवशी आणि निकालाच्या दिवशी यावे लागत होते. दादा सोबत नाही म्हणून १० महिने तळ ठोकावा लागत आहे. दादांवर बोलल्याशिवाय यांची जाहिरात होणार नाही, या शब्दांत रुपाली चाकणकर यांनी हल्लाबोल केला.
अजित पवार मुख्यमंत्री व्हावे ही आमची इच्छा
अजित पवारांनी निर्णय घेतला तो विकासासाठी घेतला आहे. अनेक चांगले निर्णय घेतले अजित पवारांनी घेतले आहे. १८ जानेवारीला मुबंईत महिला मेळावा आयोजित केला आहे. येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीचा विजय होणार आहे. अजित पवार मुख्यमंत्री व्हावे ही आमची इच्छा आहे. यासाठी आम्हाला काम करावे लागेल. आमचे स्वप्न आहे, त्यासाठी आम्ही प्रयत्न करू दादा मुख्यमंत्री व्हावे ही सर्वांची इच्छा आहे, असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.