दलित वर्गाला आकर्षित करण्याची राष्ट्रवादीची योजना; अजित पवारांनी दिले संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 12:48 PM2020-01-03T12:48:23+5:302020-01-03T12:49:46+5:30
दोन घडामोडींवरून राष्ट्रवादी काँग्रेसने दलित समाजाकडे आपला मोर्चा वळविल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यातच सत्ता असल्यामुळे हे काम आणखी सोप होणार आहे.
मुंबई - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपची वाढलेली ताकद आणि वाढत्या वर्चस्वाला सुरूंग लावण्यासाठी एकमेकांचे शत्रु असलेले काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आले आहेत. सत्तेत राहून पक्षविस्तार करण्याचे तिन्ही पक्षांनी निश्चित केले. राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षबांधणीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी दलितांना एकत्र करण्याची योजना राष्ट्रवादीची असल्याचे दिसून येते आहे.
गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दलित समाज एकमताने वंचित बहुजन आघाडीकडे अर्थात प्रकाश आंबेडकरांच्या मागे होता. दलित समाजाने लोकसभेला ताकद उभी केल्यामुळे वंचितला लक्षवेधी मते मिळाली होती. मात्र विधानसभेला वंचित बहुजन आघाडीचा फारसा प्रभाव दिसला नाही.
एकेकाळी दलित आणि मुस्लीम ही काँग्रेस-राष्ट्रवादीची मोठी व्होटबँक होती. मात्र मागील काही वर्षांपासून वंचित आणि एमआयएमच्या उदयामुळे मुस्लीम समाज काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसपासून दूर गेला आहे. या समाजांना जवळ आणण्यासाठी राष्ट्रवादीने पावले उचलली आहेत.
नुकत्याच झालेल्या शौर्य दिनी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास अभिवादन केले. सकाळी 7 वाजताच ते उपस्थित झाले होते. यावेळी त्यांनी शौर्यस्तंभास असलेल्या इतिहासाबद्दल उद्गगार काढले. 1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे राज्यभरातून दलित वर्ग विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येत असतो.
या व्यतिरिक्त अजित पवार यांनी इंदू मिल येथील प्रस्तावित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी केली. तसेच इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे या महिन्यात काम सुरू होणार आहे. यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत याच महिन्यात देण्यात येईल. पुढील दोन वर्षांत अर्थात 14 एप्रिल 2022 पर्यंत स्मारकाचे काम पूर्ण होईल, असं अजित पवार यांनी म्हटले आहे.
या दोन घडामोडींवरून राष्ट्रवादी काँग्रेसने दलित समाजाकडे आपला मोर्चा वळविल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यातच सत्ता असल्यामुळे हे काम आणखी सोप होणार आहे.