हर्षवर्धन पाटलांना 'दे धक्का'; इंदापुरात दाखल होणार शिवस्वराज्य यात्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 11:40 AM2019-08-24T11:40:39+5:302019-08-24T11:42:51+5:30
काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होणार हे निश्चित मानले जात आहे. अशा स्थितीत राष्ट्रवादी इंदापूरची जागा आपल्याकडेच ठेवण्यावर ठाम आहे. त्यामुळे भरणे यांची उमेदवारी येथून पुन्हा एकदा निश्चित मानली जात असून पाटील यांची वाट खडतर झाली आहे.
मुंबई - माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरू असलेली जुगलबंदी अद्याप सुरूच आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांना जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीवरून स्वपक्षाकडून डावलल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस हर्षवर्धन पाटलांना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रस इंदापूरच्या जागेवर ठाम असल्याचे दिसून येते.
भाजपच्या महजानदेश यात्रेला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यभर शिवस्वराज्य यात्रा काढण्यात येत आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात ही यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा आता इंदापूरमध्ये दाखल होणार आहे. ही यात्रा राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. यावेळी अजित पवार, धनंजय मुंडे आणि डॉ. अमोल कोल्हे यांच्या तोफा धडाडणार आहे. शिवस्वराज्य यात्रा इंदापूरात येणार असल्यामुळे राष्ट्रवादी ही जागा सोडण्याच्या तयारीत नाही, असंच चित्र सध्या तरी आहे.
जिल्ह्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते असलेले हर्षवर्धन पाटील यांना काँग्रेसकडूनही मोठा धक्का बसला आहे. पाटील हे भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याने जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या रिक्त जागेसाठी चर्चेत असलेल्या अंकिता पाटील यांच्या नावाचा पत्ता कापत ऐनवेळी दत्ता झुरंगे यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. त्यातच आता शिवस्वराज्य यात्रेचं इंदापूरममध्ये आयोजन करून राष्ट्रवादीनेही पाटील यांना धक्का दिला आहे.
एकूणच काँग्रेससह राष्ट्रवादीकडूनही धक्के बसत असल्याने हर्षवर्धन पाटील यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे. त्यातच काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होणार हे निश्चित मानले जात आहे. अशा स्थितीत राष्ट्रवादी इंदापूरची जागा आपल्याकडेच ठेवण्यावर ठाम आहे. त्यामुळे भरणे यांची उमेदवारी येथून पुन्हा एकदा निश्चित मानली जात असून पाटील यांची वाट खडतर झाली आहे.