वज्रमुठ सभेत अजित पवारांचे भाषण नाही; कारण काय? काँग्रेसचे एक बडे नेतेही येणार नाहीत...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 06:28 PM2023-04-16T18:28:52+5:302023-04-16T18:29:26+5:30
अजित पवार हे भाजपविरोधात भुमिका घेत नाहीएत, असा आरोप काही दिवसांपूर्वीच काँग्रेस नेत्यांनी केला होता.
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपासोबत जाणार असल्याच्या वावड्यांमध्येच नागपुरात आज उद्धव ठाकरे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची वज्रमुठ सभा होत आहे. या सभेला मोठे शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. असे असताना या सभेमध्ये अजित पवार हे बोलणार नसल्याने चर्चांना उधाण आले आहे.
अजित पवार हे भाजपविरोधात भुमिका घेत नाहीएत, असा आरोप काही दिवसांपूर्वीच काँग्रेस नेत्यांनी केला होता. यातच शिंदेंसह १६ आमदार अपात्र ठरणार आणि शिंदे सरकार पडणार असा दावा विरोधी पक्ष करत आहेत. यामुळे भाजपा अजित पवारांच्या साथीने सरकार स्थापन करणार अशा चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत होत आहेत. यावर अजित पवार यांनी आपण दिल्लीला गेलो नाही, अमित शहांना भेटलो नाही, असे म्हटले आहे.
नागपुरमधील महाविकास आघाडीच्या सभेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसचे अनिल देशमुख भाषण करणार आहेत. अजित पवार तिथे असूनही भाषण का करणार नाहीत, याबाबत विचारण्यात आले असता अजित पवार म्हणाले की, प्रत्येक पक्षाचे दोन नेते भाषण करणार हे आधीच ठरलेले आहे. संभाजीनगरातील सभेत मी आणि धनंजय मुंडे यांचे भाषण झाले. इकडे ठरल्याप्रमाणे दुसरे नेते भाषण करतील.
तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे या सभेला येणार नाहीएत. यासाठी त्यांनी स्थानिक निवडणुकीचे कारण दिले आहे. 'नांदेड जिल्ह्यातील स्थानिक निवडणुकांची पूर्वतयारी सुरू असल्याने आज नागपूर येथील महाविकासआघाडीच्या वज्रमूठ सभेला उपस्थित राहणे शक्य होणार नाही. आघाडीच्या प्रमुख नेत्यांना मी याबाबत पूर्वकल्पना दिली आहे, असे चव्हाण म्हणाले आहेत.