ना शिंदे ना फडणवीस, कोल्हापूरच्या सभेत कन्हैया कुमारांचं टार्गेट अजितदादा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2023 06:42 PM2023-08-20T18:42:39+5:302023-08-20T18:43:10+5:30
जर कुणी चुकीचे असेल तर तो चुकीचाच आहे. तो भाजपात जाऊन बरोबर ठरत नाही असा टोला कन्हैया कुमार यांनी भाजपाला लगावला.
कोल्हापूर – आज व्यासपीठावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत. आम्ही तुम्ही कुठल्या पवारांचे हे विचारणार नाही. तर तुम्ही खऱ्या राष्ट्रवादीचे आहात तर ते विकलेल्या राष्ट्रवादीचे आहेत. भाजपाचे इलेक्शन डिपार्टमेंट म्हणजे ED, त्यातून राजकारण केले जाते. ईडी पाठवतात अन्यथा सीडी पाठवतात. ज्यांची ईडी, सीडी नाही तो खरा आहे आणि ज्यांची ईडी, सीडी आहे ते खोटे आहेत, ते जाऊन असत्यासोबत उभे राहिलेत अशा शब्दात काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
कोल्हापूरात सद्भावना रॅलीत कन्हैया कुमार यांनी लोकांना संबोधित केले. त्यावेळी कन्हैया कुमार म्हणाले की, गुजरात से आया मेरा दोस्त, दोस्त को सलाम करो...सध्या अजितदादा सलाम ठोकतायेत. पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात म्हटलं ७० हजार कोटींचा घोटाळा केला. इलेक्शन डिपार्टमेंट सक्रीय झाले. आता अजितदादा तिथे गेल्या वर कुठला घोटाळा झाला नाही. भाजपाच्या वॉशिंग मशिनमध्ये सर्वकाही साफ झाले. आता डाग अच्छे है, हा खेळ समजून घ्या. बाहेरून येणारे महाराष्ट्रात एकमेकांविरोधात लढवले जात आहे. शिवसेना, NCP आणि काँग्रेसची ही लढाई नाही तर सत्याची लढाई आहे. महाराष्ट्राला सत्यासोबत राहावे लागेल असं त्यांनी म्हटलं.
तसेच जर कुणी चुकीचे असेल तर तो चुकीचाच आहे. तो भाजपात जाऊन बरोबर ठरत नाही. हे पहिले ईडी पाठवतात. इलेक्शन डिपार्टमेंट जातो, नेत्याला घाबरवलं जाते. जर नेता घाबरला तर लगेच त्याला भाजपाचे उपरणे घालून त्याचे सर्व गुन्हे माफ केले जातात. नेत्यांच्या घरी पाहुणे पाठवतात. ईडी जाते तेव्हा चोर चोर ओलडले जाते. घाबरून ते भाजपात गेले संत आहे, साधू, महात्मा आहेत बोलले जाते. हे सर्व तुमच्या डोळ्यासमोर घडतंय. भाजपाच्या खोट्याचा पर्दाफाश झाला तर खोटी चाणक्यनीती उघड होईल. महाराष्ट्राच्या सर्वसामान्यांच्या आत्मसन्मानाचा हा मुद्दा आहे. तुम्ही एका पक्षाचा लोकप्रतिनिधी निवडून देता, तिथून इलेक्शन डिपार्टमेंट येते, नेता घाबरला तर भाजपात, नाही गेला तर इथे राहतो. देशातील विरोधी पक्षाला संपवण्याचा घाट घातला जातोय. कारण मित्रासाठी होणारी देशाची लूट यावर कुणालाही प्रश्न विचारता येऊ नये असा आरोप कन्हैया कुमार यांनी केला.
महाराष्ट्राचा विचार देशाचा विचार बनतो
दरम्यान, आम्ही कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रेत चालत होतो, तेव्हा हिंगोलीजवळ हजारो लोक कोल्हापुरी फेटा बांधून रस्त्याच्या बाजूला उभे होते. त्याठिकाणी आमची भेट राहुल पाटील, बंटी पाटील भेटले. ही हजारो माणसं कुठून आली हा प्रश्न मला पडला, एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात लोकं आली होती. भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात पोहचली. तेव्हा खरोखरच महाराष्ट्र देशाला दिशा देणारी भूमी आहे. महाराष्ट्राचा विचार देशाचा विचार बनतो. एका शिस्तीने विचार ऐकायला लोकं येतात. ही ओळख शाहू-फुले-आंबेडकर आणि संताची आहे. आंदोलनाची भूमी महाराष्ट्राची आहे. ही लोकं आमच्या कोल्हापुरची आहे. समता भूमीची लोकं आहेत असं मला सांगितले. पुढे कोल्हापूरात या असं मला निमंत्रण दिले. मी तेव्हाच सांगितले यापुढे कधीही येईन कोल्हापूरला आवश्यक येईन असं कन्हैया कुमार यांनी म्हटलं.