“...तरच मी माझे शब्द मागे घेईन”; संजय गायकवाड यांनी राहुल गांधींसमोर ठेवली मोठी अट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 05:17 PM2024-09-18T17:17:58+5:302024-09-18T17:19:07+5:30
Sanjay Gaikwad Condition to Rahul Gandhi: राहुल गांधी यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे, संविधानाचा अपमान केला आहे, असे संजय गायकवाड यांनी म्हटले आहे.
Sanjay Gaikwad Condition to Rahul Gandhi:काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत जाऊन भारतातील आरक्षण संपवण्यासंदर्भात विधान केले. यानंतर राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटल्या. राहुल गांधींवर बोचऱ्या शब्दांत टीका करण्यात आली. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधींबद्दल केलेल्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. काही ठिकाणी गुन्हेही दाखल करण्यात आले. यानंतर आता संजय गायकवाड यांनी राहुल गांधींसमोर एक अट ठेवली आहे.
प्रत्यक्षात देशाला ४०० वर्षे मागे नेण्याची काँग्रेसची योजना आहे. काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे. जे त्यांच्या पोटात होते ते बाहेर आले आहे. बाबासाहेबांनी जातींना रिझर्व्हेशन दिले होते. लोकसभा निवडणुकीत भाजपा हे रिझर्व्हेशन रद्द करणार असल्याचा खोटा प्रचार केला गेला. काँग्रेसने निवडणुकीत मत मागितले. आता त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे. अशा प्रकारचे वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींची जीभ कापली पाहिजे. जो कापेल त्याला ११ लाख रुपये देणार. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात एससी, एसटी, ओबीसी यांना समाजात ताठ मानेने जगण्यासाठी आरक्षण दिले. काँग्रेसचे नेते विदेशात जाऊन माझ्या देशातले रिझर्व्हेशन संपवायचे आहे, असे वक्तव्य केले. पोटातील मळमळ त्यांनी ओकून दाखविली. लोकसभेला फेक नरेटिव्ह ठेवून लोकांची मते घेतली, या शब्दांत संजय गायकवाड यांनी टीका केली होती.
...तरच मी माझे शब्द मागे घेईन
मीडियाशी बोलताना संजय गायकवाड म्हणाले की, राहुल गांधी यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे, संविधानाचा अपमान केला आहे. संपूर्ण देशाच्या पीडित समाजाचा अपमान केला आहे. त्यांनी मुंबईच्या चैत्यभूमीवर जाऊन तिथे माथा टेकावा किंवा नागपूरच्या दीक्षाभूमिवर माथा टेकावा. बाबासाहेब आंबेडकरांची माफी मागावी. राहुल गांधी यांनी तसे केले तर जी घोषणा केली आहे की, त्याबाबत माझे शब्द मी मागे घेईन, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी संजय गायकवाड यांच्याविरोधात दिल्लीत तक्रार करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टू यांच्यासह संजय गायकवाड यांच्याविरोधात ही तक्रार दाखल झाली आहे. केसी वेणुगोपाल यांनी राहुल गांधींबाबत भाजप नेत्यांनी वापरलेल्या भाषेवरुन सर्व राज्य काँग्रेसला पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी राहुल गांधींविरोधात अपशब्द वापरणाऱ्या भाजप नेत्यांविरोधात निदर्शने करण्यास सांगितले आहे.