यायचे बऱ्याच जणांना आहे पण तावूनसुलाखून आम्ही मोजक्यांनाच घेत आहोत : चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 06:54 PM2019-07-22T18:54:16+5:302019-07-22T18:56:09+5:30
त्यामुळे राधाकृष्ण विखेंना घेतले पण छगन भुजबळांना नाही.
पुणे: पाच जिल्ह्यांची निवडणूक लढतो, पवार कधी लढलेत आहेत का.? पण माझे वैशिष्ट्य आहे की मी कधीच कुणावर उचकत नाही. त्यामुळे अजित पवारांना काय बोलायचे ते बोलू द्या. मात्र आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसे तर भाजपात यायचे बऱ्याच जणांना आहे परंतु तावूनसुलाखून आम्ही मोजक्यांनाच घेत आहोत.. अशा शब्दांत भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना पुन्हा एकदा सूचक वक्तव्य केले..
आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर चंद्रकांत पाटील यांच्याकडे भाजपाने प्रदेशाध्यक्षपद व पुण्याचे पालकमंत्री अशा दोन मुख्य जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पाटील यांनी पुण्यात सोमवारी भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. यावेळी ते बोलत होते. काही दिवसांपूर्वी पुण्यातल्या एका कार्यक्रमात माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी चंद्रकात पाटलांना काही ना काही बोलायची सवय आहे. तो त्यांचा स्वभाव आहे आणि स्वभावाला औषध नसते अशा शब्दांत पाटील यांच्यावर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना पाटील म्हणाले, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस व राष्ट्रवादीतील अनेकजण भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहे, पण उमेदवार घेताना तावूनसुलाखून घेण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे राधाकृष्ण विखेंना घेतले पण छगन भुजबळांना नाही. कारण विखेंवर कसलेही आरोप नाहीत.