राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येताच काँग्रेसला धक्का, मोठा नेता भाजपामध्ये प्रवेश करणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 05:36 PM2024-03-12T17:36:19+5:302024-03-12T17:37:47+5:30
Padmakar Valvi : राहुल गांधी महाराष्ट्रात पोहोचताच काँग्रेसला पद्माकर वळवींच्या रुपात धक्का बसला आहे.
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. मात्र, त्याआधीच काँग्रेसला नंदुरबारमध्येच मोठा धक्का बसला आहे. नंदुरबारचे माजी पालकमंत्री आणि काँग्रेस नेते पद्माकर वळवी (Padmakar Valvi) भाजपाच्या वाटेवर आहेत. पद्माकर वळवी यांनी आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. पद्माकर वळवी उद्या (१३ मार्च) भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत.
राहुल गांधी महाराष्ट्रात पोहोचताच काँग्रेसला पद्माकर वळवींच्या रुपात धक्का बसला आहे. पद्माकर वळवी यांचा उद्या भाजपामध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. दरम्यान, पद्माकर वळवी हे भाजपामध्ये जाणार, अशी चर्चा गेल्या दोन वर्षांपासून सुरु होती. मात्र पद्माकर वळवी यांनी या चर्चा नेहमीच फेटाळल्या होत्या. मात्र, अखेर त्यांनी चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली असून भाजपा प्रवेश करणार आहेत.
दरम्यान, भारत जोडो न्याय यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात राहुल गांधी हे मंगळवारी गुजरातमधून महाराष्ट्रात दाखल झाले आहेत. नंदूरबार येथून ही यात्रा १३ मार्चला धुळे, मालेगाव, १४ मार्चला नाशिक, १५ मार्च रोजी पालघर, ठाणे असा प्रवास करत ही यात्रा १६ मार्च रोजी मुंबईत दाखल होणार आहे. तर या यात्रेचा समारोप हा १७ मार्च ला होणार आहे. दरम्यान राहुल गांधी नंदूरबारमध्ये दाखल झाल्यानंतर आदिवासी बांधवांनी त्यांचे स्वागत केले.
कोण आहेत पद्माकर वळवी?
पद्माकर वळवी हे नंदुरबारमधील शहादा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार आहेत. पद्माकर वळवींनी राज्याच्या क्रीडा खात्याची धुरा सांभाळली आहे. ते मंत्री होते. नंदुरबार आणि उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसच्या बड्या चेहऱ्यापैकी एक म्हणून पद्माकर वळवी यांची ओळख आहे. त्यांच्याकडे नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही होतं. २००९ मध्ये ते शहादा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते. मात्र २०१४ मध्ये त्यांचा पराभव झाला. पद्माकर वळवी यांच्या पत्नीही राजकारणात आहेत. त्या सध्या जिल्हा परिषद सदस्या आहेत.