राहुल गांधींची पदयात्रा ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 02:52 PM2022-09-06T14:52:24+5:302022-09-06T14:55:25+5:30
थोरात म्हणाले की, पुन्हा एकदा जुलमी सरकारच्या विरोधात एक होण्याची वेळ आली आहे.
मुंबई : काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबरपासून निघणारी कन्याकुमारी ते काश्मीर ही ‘भारत जोडो पदयात्रा’ ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रात प्रवेश करणार असल्याची माहिती सोमवारी येथे प्रदेश काँग्रेसच्या वतीने आयोजित पत्रपरिषदेत देण्यात आली.
महाराष्ट्रात ही यात्रा देगलूर (जि. नांदेड) येथे ७ नोव्हेंबरला प्रवेश करेल व नांदेडमार्गे पुढे १६ दिवसांत ३८३ किमीचे अंतर राज्यातून पार करेल, अशी माहिती मध्य प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितू पटवारी यांनी दिली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात आदी उपस्थित होते.
थोरात म्हणाले की, पुन्हा एकदा जुलमी सरकारच्या विरोधात एक होण्याची वेळ आली आहे. माणसा-माणसांमध्ये भेद करण्याचे, विषमतेचे, द्वेषाचे राजकारण वाढीस लागले आहे. देशाच्या एकतेसाठी पुढाकार घेण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षाची असून, त्यासाठीच भारत जोडो यात्रा निघणार आहे.
पटोले म्हणाले की, देशाची सुरक्षितता व देशातील ज्वलंत प्रश्न सोडवण्याकडे लक्ष देण्याऐवजी केवळ राजकीय फायदा डोळ्यासमोर ठेवून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर आले आहेत. गणराया अमित शहा यांना देश विकण्याची नाही तर देशहिताचे काम करण्याची सदबुद्धी देवो.