राहुल गांधींनी सर्व हिंदूंची माफी मागावी, चित्रा वाघ यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 11:27 AM2024-07-02T11:27:29+5:302024-07-02T11:28:27+5:30
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही राहुल गांधी यांच्यावर टीका करत सर्व हिंदूंची माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
मुंबई : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावर भाषण करताना लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी 'हिंदूं'बद्दल टिप्पणी करत भाजपला लक्ष्य केले. यावरून आता सत्ताधारी भाजपचे नेते राहुल गांधी यांच्यावर सातत्याने निशाणा साधत आहेत. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही राहुल गांधी यांच्यावर टीका करत सर्व हिंदूंची माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
यासंदर्भात भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी ट्विट केले आहे. हिंदू असणे हेच आमचे अस्तित्व आहे. हीच आमची ओळख आहे आणि हा या देशाचा आत्मा आहे. पण माझा प्रश्न आहे की इटालियन संस्कृतीत वाढलेल्या राहुल गांधी यांना हिंदू धर्माबद्दल शंका का आहे? टीकेचा स्तर तुम्ही किती खाली आणणार? असे सवाल चित्रा वाघ यांनी केले आहेत.
याचबरोबर, लोकसभेत राहुल गांधी यांनी भगवान शंकराचा फोटो दाखवून अपमान केला. इतर धर्मांबद्दल अशा गोष्टी करण्याचे धाडस तुमच्यात आहे का? निवडणुकीच्या काळात मंदिरात जाऊन दर्शन घेणे, ही केवळ नौटंकी होती, हे तुमच्या वागण्यावरून दिसते. युवराजने आक्षेपार्ह विधान करून हिंदू धर्म आणि देशभरातील तमाम हिंदूंचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांनी या सर्वांची माफी मागावी, असे चित्रा वाघ यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.
हिंदू होना ही हमारा अस्तित्व है..यही हमारी पहचान है और यही इस देश की आत्मा है लेकिन मेरा सवाल यह है कि इटालियन संस्कृति में पले-बढ़े राहुल गांधी को हिंदू धर्म पर संदेह क्यों है..?
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 2, 2024
राहुल जी आप और कितने गिरोगे ।
लोकसभा में राहुल गांधी ने भगवान शंकर की फोटो दिखाकर उनका अपमान… pic.twitter.com/oj0HvKGRxU
दरम्यान, काल राहुल गांधी यांनी लोकसभेत भाषणाची सुरुवात संविधानाची प्रत हातात घेऊन केली. यावेळी राहुल गांधी यांनी भाजपवर आरोप केला की, भाजप देशात हिंसा, द्वेष आणि भीती पसरवत आहे. हे लोक हिंदू नाहीत, कारण ते २४ तास हिंसाचारावर बोलतात, असा दावाही राहुल गांधी यांनी केला. तसेच, हिंदू धर्मात स्पष्ट लिहिले आहे की, सत्याची साथ दिली पाहिजे, असे म्हणत राहुल गांधी यांनी भाजपच्या हिंदुत्वावर टीका केली.