राहुल गांधींचा वाढदिवस साजरा न करता त्याच पैशातून काँग्रेस कार्यकर्त्यांचा गरजूंना मदतीचा हात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 03:32 PM2020-06-19T15:32:53+5:302020-06-19T18:24:23+5:30
कोणताही जाहीर कार्यक्रम न करता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी गरजूंना मदत करून राहुलजी गांधी यांचा वाढदिवस साजरा करत आहोत...
मुंबईः सध्या कोरोनामुळे असलेली गंभीर परिस्थिती आणि चीन सीमेवर आपले २० जवान शहीद झाल्याच्या पार्श्वभूमीवर राहुलजी गांधीजी आपला वाढदिवस साजरा करणार नाहीत. त्यामुळे कोणताही जाहीर कार्यक्रम न करता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी गरजूंना मदत करून राहुलजी गांधी यांचा वाढदिवस साजरा करत आहोत, अशी माहिती काँग्रेसचे नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे आज राज्यभरात गरजूंना तयार जेवण आणि अन्नधान्याचे वाटप केले जात आहेत. तसेच रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून रक्तदान शिबिरे आयोजित केली आहेत. मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप केले जात असून डॉक्टर नर्सेस यांना PPE कीटचे वाटप करण्यात येत आहे. त्यासोबतच गेल्या तीन महिन्यांपासून अविरतपणे कार्यरत असणा-या कोरोना योद्ध्यांचा सन्मान काँग्रेस पक्षातर्फे करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून आज संगमनेर येथे गरजूंना जेवण, अन्नधान्य, मास्क सॅनिटायझरचे वाटप केले, कोरोना योद्ध्यांना PPE कीट दिले व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
संगमनेर येथील कार्यक्रमात बोलताना थोरात म्हणाले की, देशात व राज्यात कोरोना आणि चीनच्या कारवाया असे दुहेरी संकट उभे ठाकले आहे. नागरिकांच्या सर्वोच्च हिताला प्राधान्य देत काँग्रेसने कायम देशासाठी काम केले आहे. राहुल गांधी यांचा वाढदिवस साधेपणाने व विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून साजरा केला. काँग्रेसच्या वतीने राज्यभरात ५ लाख गरजू गरिबांना तयार जेवण आणि अन्नधान्य कीट्सचे वाटप, ५ लाख नागरिकांना मास्कचे वाटप केले. राज्यभरात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ५ हजार कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. तसेच राज्यभरातील कोरोना संकटात लढणाऱ्या योद्धयांना पीपीई कीट, सॅनिटायझरचे वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला. संगमनेर येथील कार्यक्रमाला आमदार डॉ. सुधीर तांबे, ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यभरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला दोन मिनिटे मौन राहून सीमेवर शहिद झालेल्या २० वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अमरावती येथील रक्तदान शिबिरात महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी रक्तदान केले तर बुलढाण्यात जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी चिखली येथे रक्तदान केले. नांदेड येथील कार्यक्रमात आ. अमर राजूरकर, आ. मोहनराव हंबर्डे, माजी मंत्री. डी. पी. सावंत यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांना पीपीई कीटचे वाटप करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यात वरोराच्या आमदार सौ.प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते जीवनावश्यक कीटचे वाटप करण्यात आले. औरंगाबाद, नाशिक, पुणे, कोल्हापूर, लातूर, सोलापूर, सांगलीसह राज्यातील विविध भागात तयार जेवण, अन्नधान्य, मास्क सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. पोलीस, डॉक्टर, नर्स या कोरोना योद्ध्यांना PPE कीट देण्यात आले. आर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. सफाई कामगार यांचाही सन्मान करण्यात आला. काँग्रेस पक्षाचे मंत्री, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवा दल, एनएसयुआय या सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशन्सनीही मोठ्या प्रमाणात गरजूंना मदत केली. या कार्यक्रमाला कसलेही उत्सवी स्वरुप न देता अत्यंत साधेपणाने सामाजिक भान राखत राहुल गांधी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.