राऊतांच्या वक्तव्यांनी आघाडीत बिघाडी; काँग्रेससह राष्ट्रवादीतही नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 02:52 PM2020-01-16T14:52:13+5:302020-01-16T14:53:15+5:30
राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना स्टेफनी म्हटले. त्यानंतर महाविकास आघाडीचे चाक म्हणून संबोधले. त्यांच्या या वक्तव्यावर श्रीनिवास पवार यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी फेसबुक पोस्ट लिहून राऊत यांची कानउघडणी केली आहे.
मुंबई - विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीची स्थापना करताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्यामुळे राऊत मीडियात ट्रेंडमध्ये होते. आता सरकार स्थापन झाले आहे. मात्र राऊत थांबायचा नाव घेत नाहीत. मात्र त्यांच्या काही वक्तव्यांमुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेचे मित्रपक्ष असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राऊतांच्या वक्तव्यामुळे नाराजी निर्माण झाली आहे.
लोकमतने घेलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी अंडरवर्ल्ड विषयीच्या आठवणी सांगितल्या. पूर्वीच्या काळी छोटा शकील, दाऊद हेच ठरवायचे पोलीस कमिशनर कोण होणार, हाजी मस्तान मंत्रालयात गेल्यावर संपूर्ण मंत्रालय त्याला घ्यायला खाली यायचे, असं सांगताना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविषयी राऊतांनी एक गौप्यस्फोट केला. कुविख्यात गुंड करिम लाला याला इंदिरा गांधी भेटल्या होत्या, असं संजय राऊत यांनी म्हटले. त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी आहे. संजय निरुपम यांनी तर शिवसेनेला पश्चाताप करावा लागेल, इथपर्यंत इशारा देऊन टाकला.
याच मुलाखतीत राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना स्टेफनी म्हटले. त्यानंतर महाविकास आघाडीचे चाक म्हणून संबोधले. त्यांच्या या वक्तव्यावर श्रीनिवास पवार यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी फेसबुक पोस्ट लिहून राऊत यांची कानउघडणी केली आहे. श्रीनिवास पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये 'विनाशकाले विपरीत बुद्धी (संजय राऊत) असं म्हटले आहे.